
देश अगोदरच कोरोनाच्या संकटाने त्राही माम झाला आहे. त्यात कधी बंगालच्या उपसागरात तर कधी अरबी समुद्रात कमी दाबाचे पट्टे निर्माण होतात आणि त्यातून जन्माला आलेली महासंहारक चक्रीवादळे हजारो गावांना आपल्या कवेत घेतात. संकटांची ही मालिका थांबायला तयार नाही. पाच राज्यांना तडाखा देणाऱ्या ‘तौकते’ चक्रीवादळानंतर आता पूर्व किनारपट्टीवरील ओडिशा व पश्चिम बंगाल या राज्यांवर असेच संकट घोंघावते आहे. हवामान खात्याचा इशारा पाहता आतापासूनच तिथेही सावधगिरीची पावले पडायला हवीत!
संकटे आली की ती चोहोबाजूंनी येतात, असे म्हणतात. आपला देशही सध्या तोच अनुभव घेतो आहे. गेल्या दीड-दोन वर्षांपासून लागोपाठ उसळणाऱ्या कोरोनाच्या लाटा, चक्रीवादळामुळे समुद्रात उसळणाऱ्या लाटा आणि वादळी पावसाने देशाचा पिच्छाच पुरविला आहे. ‘तौकते’ या चक्रीवादळाने महाराष्ट्रासह पाच राज्यांना दिलेला तडाखा ताजा असतानाच आता आणखी एका चक्रीवादळाची बातमी धडकली आहे. ‘तौकते’ चक्रीवादळाने कर्नाटक, केरळ, गोवा, महाराष्ट्र आणि गुजरात या पश्चिम किनारपट्टीवरील राज्यांमध्ये हाहाकार उडविला. यातून देश व आपत्ती निवारण यंत्रणा सावरत नाही, तोच आता पूर्व किनारपट्टीवरही चक्रीवादळ धडकण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने वर्तविला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने अंदमानच्या समुद्रात चक्राकार स्थिती निर्माण झाली आहे. येत्या 23 मे रोजी यास नावाचे हे चक्रीवादळ पूर्व किनारपट्टीकडे सरकणार आहे. या चक्रीवादळाची दिशा आणि इतर अचूक तांत्रिक माहिती मिळण्यास हवामान खात्याला आणखी एक-दोन दिवसांचा अवधी लागेल. मात्र, बंगालच्या समुद्रात दूरवर घोंघावत असलेले हे चक्रीवादळ पूर्व किनारपट्टीवरील पश्चिम बंगाल व ओडिशा या राज्यांच्या समुद्र किनाऱ्यालगतच्या गावांना तडाखा देण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तूर्तास हे चक्रीवादळ हिंदुस्थानपासून लांब आहे आणि आपल्या देशाच्या
हवामानाच्या पट्ट्यात
जेव्हा हे वादळ प्रवेश करेल, तेव्हा हवामानाच्या दैनंदिन तपशिलात याविषयी अधिक माहिती देता येईल, असे या चक्रीवादळावर नजर ठेवून असलेल्या तज्ञांनी म्हटले आहे. या चक्रीवादळाची व्याप्ती किती मोठी आहे, संहारक क्षमता किती आहे, याची अचूक माहिती अजून पुढे आलेली नसली, तरी आणखी एक नैसर्गिक आपत्ती देशाच्या उंबरठय़ावर उभी आहे, हे मात्र खरे. चक्रीवादळासारख्या आपत्तींना तोंड देणे, हे तसे जिकरीचे काम. मात्र, आधुनिक तंत्रज्ञानामुळे हवामान खात्याकडून वर्तविण्यात येणारे अंदाज आणि वेळोवेळी दिले जाणारे इशारे, यातील अचुकता कमालीची वाढल्यामुळे वादळ धडकण्यापूर्वीच खबरदारीच्या उपाययोजना करण्यास प्रशासनाला अलीकडच्या काळात पुरेसा वेळ मिळतो आहे, ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब. शिवाय केंद्र सरकार आणि ज्या राज्यांवर हे संकट येऊ घातले आहे, त्यांच्यातील माहितीची देवाणघेवाण व उत्तम ताळमेळ यामुळेही चक्रीवादळासारख्या संकटातून मनुष्यहानी कशी कमी करता येईल, आर्थिक नुकसान कसे कमी करता येईल, याचे सूक्ष्म नियोजन करण्याची संधी प्रशासनाला नक्कीच मिळते. चक्रीवादळासारख्या अक्राळविक्राळ
आपत्तींना रोखण्याचे सामर्थ्य
जरी विज्ञानाला शक्य नसले, तरी संकटाच्या अचूक पूर्वसूचनांमुळे हाहाकार कमी करण्यास मदत होते, याचा ताजा अनुभव ‘तौकते’ चक्रीवादळात आपण घेतला आहे. क्षणार्धात होत्याचे नव्हते करण्याची क्षमता असलेले हे चक्रीवादळ होते. ताशी 120 ते 160 कि.मी. इतक्या प्रचंड वेगाने किनारपट्टीवरील गावांवर धडकलेले हे चक्रीवादळ, सोबत पावसाचे तुफान आणि वादळाचे एकूणच रौद्ररूप पाहता भयंकर जीवितहानी होण्याचा धोका होता. मात्र, एकाच वेळी पाच राज्यांवर हे अस्मानी संकट कोसळूनही मोठी जीवितहानी होणार नाही, यासाठी जिल्हा प्रशासनासह एनडीआरएफ व नौदलाने बचाव कार्यासाठी जी शर्थ केली, त्याला तोडच नाही. देश अगोदरच कोरोनाच्या संकटाने त्राही माम झाला आहे. त्यात कधी बंगालच्या उपसागरात तर कधी अरबी समुद्रात कमी दाबाचे पट्टे निर्माण होतात आणि त्यातून जन्माला आलेली महासंहारक चक्रीवादळे हजारो गावांना आपल्या कवेत घेतात. संकटांची ही मालिका थांबायला तयार नाही. पाच राज्यांना तडाखा देणाऱ्या ‘तौकते’ चक्रीवादळानंतर आता पूर्व किनारपट्टीवरील ओडिशा व पश्चिम बंगाल या राज्यांवर असेच संकट घोंघावते आहे. हवामान खात्याचा इशारा पाहता आतापासूनच तिथेही सावधगिरीची पावले पडायला हवीत!































































