
मुलांच्या ज्या हातांनी आईचे अश्रू पुसावेत तेच हात चाकूचे वार करून तिचे रक्त सांडत आहेत. अशा ‘कलियुगी’ गदारोळात मराठवाडय़ातील बीड जिल्ह्यातील एखादा ओंकार शिंदे हा सातवीतील चिमुरडा कांदा कापताना आईच्या डोळय़ातून येणाऱ्या अश्रूंनी अस्वस्थ होतो आणि ते येऊ नये म्हणून ‘स्मार्ट चाकू’ बनवतो. आई आणि मुलगा. नाते एकच, पण आईचे रक्त आणि अश्रू यांची ‘किंमत’ मात्र तिच्याच पोटच्या पोरांसाठी वेगवेगळी झाली आहे. कोणी तिच्या अश्रूंनाही किंमत देत नाही आणि रक्तालाही, तर एखादा ओंकार स्वतःचे रक्त आटवून तिचे अश्रू थांबविण्याचा प्रयत्न करतो. ‘आई’ या छोटय़ा शब्दात संपूर्ण जग, सृष्टी सामावली आहे, असे म्हणतात, पण या जगात ‘आई’ या दोन अक्षरांना किती जागा उरली आहे?
मातृप्रेमाला कसलीच उपमा देता येत नाही. किंबहुना ‘स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी’ एवढे सर्वोच्च स्थान आईला कुटुंब व्यवस्थेत देण्यात आले आहे. अर्थात सध्याच्या जगात या सर्वोच्च नात्याला काळिमा फासणाऱ्या घटना सर्रास घडत असल्या तरी ‘वाईटात चांगले’ घडत असतेच. बीड जिह्यातील ओंकार अनिल शिंदे या शालेय विद्यार्थ्याला कांदा कापताना आईच्या डोळय़ांतून येणाऱ्या पाण्याने अस्वस्थ केले आणि त्या जाणिवेतून एक अफलातून संशोधन त्याच्या हातून घडले. त्याने एक असा ‘स्मार्ट चाकू’ बनवला की, जेणेकरून आपल्या आईच्या डोळय़ांतून कांदा कापताना पाणी येऊ नये. ओंकार हा मराठवाडय़ातील बीड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेचा इयत्ता सातवीतील विद्यार्थी. कांदा चिरताना आईच्या डोळय़ांतून येणारे पाणी त्याला अस्वस्थ करीत असे. या अस्वस्थतेतूनच त्याच्यातील संशोधकाने उचल खाल्ली आणि त्याने ‘स्मार्ट चाकू’ बनवला. सौर ऊर्जा आणि मोबाईल चार्जरच्या सहाय्याने चार्ज करता येणारा हा चाकू सर्वच गृहिणींसाठी उपयुक्त ठरणार आहे. कांदा कापताना कांद्यातून बाहेर पडणारे गंधकयुक्त ऑक्साईड हवेद्वारा डोळय़ांपर्यंत पोहोचते आणि त्यामुळे डोळय़ांतून पाणी येते. याच मुद्दय़ाला ओंकारने हात घातला. त्याने चाकूच्या मुठीवर ड्रोन मोटार बसवून छोटा पंखा बसवला आणि बॅटरीच्या सहाय्याने तो चालू करून
कांदा कापताना
बाहेर पडणारा गंधकयुक्त वायू विरुद्ध दिशेला ढकलला जाईल हे पाहिले. म्हणजे या वायूचा आणि डोळय़ांचा संपर्क येणार नाही आणि आईच्या डोळय़ांतून पाणी येणार नाही. ओंकारच्या या ‘स्मार्ट चाकू’ची दखल आता केंद्रीय विज्ञान आणि संशोधन विभागाने घेतली असून दिल्लीतील ‘राष्ट्रीय इन्स्पायर ऍवॉर्ड’ प्रदर्शनात हा चाकू ठेवण्यात येणार आहे. खरे तर कांदे चिरताना गृहिणींच्या डोळय़ांतून येणारे अश्रू ही एक सामान्य गोष्ट. पिढय़ान्पिढय़ा चालत आलेली. घरोघरी रोज घडणारी, पण चिमुकल्या ओंकारला त्याच्या आईच्या अश्रूंनी अस्वस्थ केले, तेदेखील हल्लीच्या विपरीत काळात. ज्या काळात आई आणि मुले यांच्यातील पवित्र नात्याला काळिमा फासणाऱ्या घटना सर्रास घडत आहेत. कुठे आईलाच ‘माता न तू वैरिणी’ बोलण्याची वेळ येत आहे, तर कुठे मुले आईच्या जिवावर उठत आहेत. त्यातही मातृप्रेमाची फेड अपकाराने, हिंसक कृत्याने करणाऱ्या मुलांची संख्या जास्तच वाढू लागली आहे. गेल्याच आठवडय़ात दिल्लीमध्ये प्रॉपर्टीसाठी पोटच्या मुलीने मित्राच्या मदतीने आपल्या आईची गळा चिरून निर्घृण हत्या केली. गेल्या महिन्यात पुणे जिह्यात इंदापूर तालुक्यात जमिनीच्या वादातून मुलाने वडिलांवर कोयत्याने वार केले आणि आईची हत्या केली. सांगलीमध्ये तर स्वतःच्या आजारपणाला कंटाळलेल्या
मुलाने आत्महत्या करण्यापूर्वी
आईचाही जीव घेतला. अभ्यासासाठी तगादा लावते म्हणून नवी मुंबईतील 15 वर्षांच्या मुलीने तिच्या आईची हत्या करून स्वतः आत्महत्या केली. जेवणात वांग्याची भाजी केली नाही या अत्यंत क्षुल्लक कारणाने नागपूरमध्ये मुलाने आईचा बळी घेतला. पोटची पोरं जन्मदात्रीच्या अश्रूंनी अस्वस्थ होण्यापेक्षा तिच्या रक्ताला जास्त चटावली आहेत का, असे वाटावे एवढय़ा भयंकर घटना हल्ली घडत आहेत. मुलांच्या ज्या हातांनी आईचे अश्रू पुसावेत तेच हात तिचा गळा घोटत आहेत. चाकूचे वार करून तिचे रक्त सांडत आहेत. अशा ‘कलियुगी’ गदारोळात मराठवाडय़ातील बीड जिह्यातील एखादा ओंकार शिंदे हा जेमतेम सातवीतील चिमुरडा कांदा कापताना आईच्या डोळय़ातून येणाऱ्या अश्रूंनी अस्वस्थ होतो आणि ते येऊ नये म्हणून ‘स्मार्ट चाकू’ बनवतो. आईच्या अश्रूंची ही ताकद आहे. आई आणि मुलगा. नाते एकच, पण आईचे रक्त आणि अश्रू यांची ‘किंमत’ मात्र तिच्याच पोटच्या पोरांसाठी वेगवेगळी झाली आहे. कोणी तिच्या अश्रूंनाही किंमत देत नाही आणि रक्तालाही, तर एखादा ओंकार स्वतःचे रक्त आटवून तिचे अश्रू थांबविण्याचा प्रयत्न करतो. ‘आई’ या छोटय़ा शब्दात संपूर्ण जग, सृष्टी सामावली आहे, असे म्हणतात, पण या जगात ‘आई’ या दोन अक्षरांना किती जागा उरली आहे?































































