
कोल्हापुरात शाहू महाराजांनंतर एन. डी. पाटलांचेच नाव ‘लोकनेता’ म्हणून लोकांच्या तोंडावर राहिले. कणखर नेता म्हणूनच त्यांची ख्याती होती. त्यांचा शब्द राजकारणात महत्त्वाचा ठरत होता. त्यांच्या शब्दांची किंमत अफाट होती. कारण नैतिकतेचे बळ व स्वाभिमानाची ताकद त्या शब्दांत होती. राजकारणातला कणखरपणा व नैतिकता लोप पावत असतानाच प्रा. एन. डी. पाटील यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. प्रा. एन. डी. पाटील यांच्यासारखे लोकनेते महाराष्ट्राच्या राजकारणात वावरले. म्हणूनच महाराष्ट्राचे राजकीय चारित्र्य आदरास पात्र ठरले. महाराष्ट्रास एन. डी. पाटील यांचे स्मरण सदैव राहील.
कणखर नेता!
प्रा.एन. डी. पाटील यांचे कोल्हापुरात निधन झाले आहे वयाच्या 93 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रा. पाटील हे महाराष्ट्रातील शेतकरी कामगार पक्षाचे नेते होते ही त्यांची ओळख अपूर्ण आहे. त्यांचे नेतृत्व एखाद्या पक्षापुरते मर्यादित नव्हते. ते महाराष्ट्रातील कष्टकऱयांचा आवाज होते. लढा आणि एन. डी. हे महाराष्ट्राच्या राजकीय-सामाजिक जीवनाचे एक समीकरण झाले होते. पाटील यांचे नाव संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ापासून राज्यात तळपत राहिले. आंदोलन व संघर्ष याला पर्यायी शब्द म्हणून एन. डी. पाटील यांचे नाव घेता येईल. कोरोनाची पहिली लाट जोर धरत असताना एन. डी. पाटील यांनी कोल्हापुरात आंदोलन केले. घरगुती वीज बिलांची होळी करणारे हे आंदोलन. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोक जमले व वयाची नव्वदी ओलांडलेले एन. डी. पाटील हे काठी टेकत या आंदोलनात पोहोचले. त्यांनी तेथे आंदोलन केले. त्यांच्या दोन्ही पायांचे दुखणे वाढले तरी ते घरी बसले नाहीत. राज्यात व देशात सरकार कोणाचे आहे याची पर्वा न करता ते कष्टकऱयांच्या हितासाठी लढा देत राहिले. त्यांनी कुणाचा दबाव मानला नाही. अखेरपर्यंत कोणत्याही ताकदीपुढे झुकले नाहीत. ‘‘एन. डी. पाटील म्हणजे पालापाचोळा नाही, कोणी काही बोलल्यावर उडून जायला!’’ असे ते म्हणत. सांगली जिह्यातील वाळवा तालुक्यातील ढवळी हे एन. डी. यांचे गाव. शाळकरी वयातच ते सत्यशोधक विचाराकडे वळले. पुढे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या संपर्कात आले. कर्मवीरांच्या
रयत शिक्षण संस्थेशी
त्यांचे नाते जुळले ते शेवटपर्यंत. रयतमध्येच त्यांनी प्राध्यापक म्हणून नोकरी स्वीकारली, पुढे रयतची धुराच त्यांच्या खांद्यावर आली व ती त्यांनी पेलली. डाव्या विचारांचा पगडा त्यांच्यावर होताच. त्यातूनच ते शेतकरी कामगार पक्षाचे पूर्णवेळ कार्यकर्ते बनले. बारामतीतील शारदा पवार यांच्या कन्येशी त्यांचा विवाह झाला. शारदाबाई या शे. का. पक्षाच्या म्हणजे डाव्या विचारांच्या. आजचे मोठे नेते शरद पवार यांच्या शारदाबाई या मातोश्री. म्हणजे एन.डी. हे पवारांचे मेहुणे, पण अनेक प्रश्नांवर एन.डीं.नी पवारांवर कठोर टीका करायला मागेपुढे पाहिले नाही. 1978 ला महाराष्ट्रात पवारांच्या नेतृत्वाखाली पुलोदचा प्रयोग झाला. त्या सरकारात एन. डी. पाटील हे सहकारमंत्री होते. आमदार म्हणून त्यांनी अभ्यासपूर्ण भाषण केले. लोकांचे व राज्याचे प्रश्न घेऊनच ते सभागृहात उभे राहिले. सहकारमंत्री म्हणून त्यांची दृष्टी व्यापक होती. कापूस उत्पादक शेतकऱयांना लाभदायक ठरलेली कापूस एकाधिकार योजना त्यांनीच सुरू केली. मंत्री असताना कोणत्याही भूमिपूजन कार्यक्रमास न जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला व अंमलात आणला. गरीब व कष्टकऱयांसाठी एन. डी. पाटलांच्या घराचे दरवाजे व मनाची कवाडे सदैव उघडी होती. रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष म्हणून ते एका पैशाचेही मानधन घेत नव्हते. पाटील हे आमदार झाले त्या दिवसापासून शेवटपर्यंत आपल्या मानधनातील रक्कम ते गरीब कार्यकर्त्यांना देत. आयुष्यभर ते साधेपणाने जगले. साधेपणा हीच त्यांची ताकद होती.
समाजकारणासाठी राजकारणाचा वापर
करणाऱया ध्येयनिष्ठ विचारवंतांच्या फळीचे ते प्रतिनिधी होते. ते जीवनभर ताठ कण्याने, स्वाभिमानाने जगले. कारण नैतिकता हाच त्यांच्या प्रत्येक आंदोलनाचा कणा होता. त्याच नैतिक बळावर त्यांनी अनेक आंदोलने यशस्वी केली. संयुक्त महाराष्ट्र लढय़ात कोल्हापूरचे नेतृत्व त्यांनी केले. सीमा भागातील मराठी जनतेवर व भाषेवर अन्यायाची काठी पडताच कोल्हापुरातून एन. डी. पाटलांची वीज कडाडत असे व त्यातून सीमा बांधवांना बळ मिळत असे. कोल्हापुरात शाहू महाराजांनंतर एन. डी. पाटलांचेच नाव ‘लोकनेता’ म्हणून लोकांच्या तोंडावर राहिले. कोल्हापूर विद्यापीठाची स्थापना व जडणघडणीत त्यांचे मोलाचे योगदान होते. पाटलांच्या व्यक्तिमत्त्वाला अनेक अंगे होती. त्यांनी गरिबीचे चटके सोसले, पण सत्ता आली म्हणून वैभव भोगले नाही. प्रा. एन. डी. पाटील यांनी शिक्षक म्हणून आपल्या जीवनाचा प्रारंभ केला. पुढे ‘रयत’सारख्या मोठय़ा शिक्षण संस्थेचे नेतृत्व त्यांनी केले. कणखर नेता म्हणूनच त्यांची ख्याती होती. त्यांनी राजकारण गाजवले. त्यांचा शब्द राजकारणात महत्त्वाचा ठरत होता. त्यांच्या शब्दांची किंमत अफाट होती. कारण नैतिकतेचे बळ व स्वाभिमानाची ताकद त्या शब्दांत होती. राजकारणातला कणखरपणा व नैतिकता लोप पावत असतानाच प्रा. एन. डी. पाटील यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. प्रा. एन. डी. पाटील यांच्यासारखे लोकनेते महाराष्ट्राच्या राजकारणात वावरले. म्हणूनच महाराष्ट्राचे राजकीय चारित्र्य आदरास पात्र ठरले. महाराष्ट्रास एन. डी. पाटील यांचे स्मरण सदैव राहील.































































