
लाहोर करार तोडणे व कारगिलचे युद्ध हिंदुस्थानवर लादणे ही आमची चूकच होती, हे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे विधान म्हणजे उशिरा सुचलेले शहाणपण आहे. जे सत्य 25 वर्षांपूर्वीच साऱ्या जगाला ठाऊक होते, त्याची कबुली आता देऊन काय उपयोग? त्यामुळे शिळ्या कढीला ऊत आणणारे ‘सत्य’ चघळत बसण्याऐवजी पुन्हा त्याच जुन्या चुका उगाळत बसण्याचे कारस्थानी उद्योग पाकिस्तानने थांबवले तरी खूप झाले!
पाकिस्तान हा मोठा चमत्कारिक देश आहे. तेथील नेते जेव्हा सत्तेच्या खुर्चीवर बसलेले असतात, तेव्हा पाकिस्तानी जनतेची मने जिंकण्यासाठी ते हिंदुस्थानविरुद्ध विष ओकत असतात. ऊठसूट हिंदुस्थानविरोधी असत्य विधाने करतात आणि सत्तेतून पायउतार झाल्यावर मात्र त्यांना पाकिस्तानच्या चुका दिसू लागतात, सत्याचे साक्षात्कार होतात व ते सांगण्याचे उमाळे त्यांना दाटून येऊ लागतात. खूप उशीर झाल्यानंतर हे बिनकामाचे सत्य ते पाकिस्तानी जनतेला समजावून सांगू लागतात. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ सध्या हेच करत आहेत. पाकिस्तानने केलेल्या पहिल्या अणुचाचणीला 28 मे रोजी 26 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात नवाझ शरीफ यांना सत्य बोलण्याचा झटका आला. या समारंभात बोलताना नवाझ शरीफ यांनी ‘कारगिल युद्ध ही पाकिस्तानची चूक होती,’ अशी जाहीर कबुली दिली. शरीफ म्हणाले, ‘‘28 मे 1998 रोजी पाकिस्तानने पाच अणुचाचण्या केल्या. त्यानंतर काही महिन्यांनी हिंदुस्थानचे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे स्वतः पाकिस्तानच्या दौऱ्यावर आले व त्यांनी पाकिस्तानसोबत लाहोर येथे शांतता करार केला. दोन्ही देशांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या. मात्र हा लाहोर करार आम्ही म्हणजे पाकिस्तानने तोडला. पाकिस्तानने कारगिलमध्ये गुप्तपणे आपले सैन्य पाठवले आणि त्यातून हिंदुस्थानसोबत युद्धाचा भडका उडाला. शांतता
कराराचा भंग
आपण केला म्हणून कारगिल युद्ध भडकले. त्यामुळे लाहोर करार मोडणे ही आमची चूकच होती.’’ कारगिल युद्धाला तब्बल 25 वर्षे पूर्ण झाल्यानंतर नवाझ शरीफ यांनी हे सत्य धडधडीतपणे पाकिस्तानच्या जनतेसमोर मांडले. या सत्यवचनाबद्दल शरीफ यांचे कौतुक करायचे म्हटले तरी या ‘उपरती’ने आता काय हशील होणार आहे? अटलबिहारी वाजपेयी यांनी हिंदुस्थानचे पंतप्रधान या नात्याने लाहोर यात्रा केली, त्या वेळी नवाझ शरीफ हेच पाकिस्तानचे पंतप्रधान होते. ज्या वेळी नवाझ शरीफ वाजपेयींना आलिंगन देऊन त्यांची गळाभेट घेत होते, त्याच वेळी पाकिस्तानचे त्यावेळचे लष्करप्रमुख जन. परवेज मुशर्रफ कारगिलमध्ये घुसखोरी करण्याचे कारस्थान रचत होते. म्हणजेच एका हाताने पाकिस्तान हिंदुस्थानशी हस्तांदोलन करत होता आणि त्याच पाकिस्तानचा दुसरा हात हिंदुस्थानच्या पाठीत खंजीर खुपसत होता. हेच पाकिस्तानचे दुहेरी चरित्र आहे. लाहोर करारात कश्मीरसह अण्वस्त्रांचा वापर न करण्याबाबत अनेक मुद्द्यांवर सहमती व्यक्त करण्यात आली होती. शांतता व स्थैर्य निर्माण करण्यास दोन्ही देश कटिबद्ध असतील, उभय देशांतील जनतेच्या हितांचे रक्षण आणि परस्पर सहकार्य यावरही लाहोर करारात भर देण्यात आला होता. मात्र दोनच महिन्यांत पाकिस्तानने हे सगळे शब्द मोडले व लाहोर कराराच्या चिंधड्या उडवत पाकिस्तानी सैन्याने नियंत्रण रेषा ओलांडून कारगिलच्या हिंदुस्थानी हद्दीत मोठी घुसखोरी केली. हिंदुस्थानी सैन्याने मोठे शौर्य गाजवून
पाकिस्तानला पिटाळून
लावले व कारगिलचे युद्ध जिंकले, हा इतिहास जगाला ठाऊक आहे. तथापि, पाकिस्तानच्या लष्कराने नवाझ शरीफ यांना अंधारात ठेवून कारगिलमध्ये घुसखोरी केली, की सरकारला विश्वासात घेऊनच मुशर्रफ यांनी हे पाऊल उचलले, याविषयी पाकिस्तानात अजूनही गोंधळाची स्थिती आहे. शरीफ सरकारच्या संरक्षण खात्याला जराही मागमूस न लागू देता मुशर्रफ यांनी हे पाऊल उचलले असेल यावर विश्वास ठेवणेही तसे कठीणच आहे. शिवाय युद्धाचा भडका उडाल्यानंतर शरीफ यांनी लोकनियुक्त सरकारचे प्रमुख या नात्याने त्याच क्षणी ही चूक कबूल करून कारगिलमधून माघार घेण्याचे निर्देश आपल्या सैन्याला का दिले नाहीत? उलट युद्धाला तोंड फुटल्यानंतर पाकिस्तान सरकारने यात आपल्या सैन्याचा कुठलाही सहभाग नसल्याचा दावा केला. कारगिलमध्ये लढणारे आमचे सैनिक नसून ते कश्मीरचेच स्वातंत्र्यसैनिक आहेत, असा दावा शरीफ सरकारने त्या वेळी केला होता, हेदेखील तेवढेच सत्य आहे. लाहोर करार तोडणे व कारगिलचे युद्ध हिंदुस्थानवर लादणे ही आमची चूकच होती, हे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे विधान म्हणजे उशिरा सुचलेले शहाणपण आहे. जे सत्य 25 वर्षांपूर्वीच साऱ्या जगाला ठाऊक होते, त्याची कबुली आता देऊन काय उपयोग? त्यामुळे शिळय़ा कढीला ऊत आणणारे ‘सत्य’ चघळत बसण्याऐवजी पुन्हा त्याच जुन्या चुका उगाळत बसण्याचे कारस्थानी उद्योग पाकिस्तानने थांबवले तरी खूप झाले!































































