
पाकिस्तान एक राष्ट्र राहिलेले नसून जगाला भार ठरलेली दहशतवाद्यांची भूमी बनली आहे. त्यांचा समूळ नायनाट करणे हे आता आवश्यक आहे. किती निरपराध्यांचे बळी जाणार? किती मायभगिनींचे कुंकू पुसणार? आता या सगळ्याचा शेवट व्हायला हवा. दहशतवाद्यांचे आठ-नऊ तळ उद्ध्वस्त झाले तरी पाकिस्तान म्हणजे दहशतवादी निर्माण करणारी फॅक्टरी आहे, ही फॅक्टरीच नष्ट झाली पाहिजे. भारतीय सैन्याने त्या दिशेने पावले टाकली आहेत. संपूर्ण देश भारतीय सैन्याला मानवंदना देत आहे. तुमच्या शौर्याला सलाम!
भारतीय सैन्याने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला आहे. मंगळवारी मध्यरात्री भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वी केले. पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर हल्ला करून पहलगाममध्ये सौभाग्य गमावलेल्या 26 मायभगिनींचा बदला पूर्ण केला. हिंदू धर्मात कुंकवास, सौभाग्य लेण्यास महत्त्व आहे. पाकपुरस्पृत दहशतवाद्यांनी त्या कुंकवाशी खेळ केला तेव्हा त्या कुंकवातून निघालेली सुडाची ज्वाला पाकिस्तानने पोसलेल्या दहशतवादी तळांपर्यंत पोहोचली. भारतीय सैन्याच्या हल्ल्यात पाकिस्तानचे हे अमानवी तळ तर उद्ध्वस्त झालेच, पण पाकिस्तानचे सरकार, तेथे असलेले दहशतवाद्यांचे आका, पाकिस्तानचे पुरापती सैन्य बिळात जाऊन लपले. प्रत्येक भारतीयाची छाती गर्वाने फुलावी असे अचाट शौर्य भारतीय सैन्याने दाखवले. जैश-ए-मोहम्मद, लश्कर-ए-तोयबा आणि हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी टोळ्यांचे कॅम्प उद्ध्वस्त झाले आहेत. पाकिस्तान झोपले होते व त्यांच्यावर बॉम्ब पडले. पाकिस्तानला प्रतिकार करण्याची संधीही भारतीय सैन्याने दिली नाही. ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये सहभागी झालेले सर्व भारतीय ‘पायलट’ आणि लढाऊ विमाने सुरक्षित परतली. याचा अर्थ असा की, भारतीय सैन्याने पाकिस्तानला घरात घुसून मारले व पुन्हा सुखरूप भारतात परत आले. पाकिस्तानला त्यांच्या कर्माची फळे मिळाली. यापुढेही मिळत राहतील. दहशतवाद्यांना पोसणारा देश अशी पाकिस्तानची प्रतिमा आहे. जगभरातील इस्लामी दहशतवादी पाकिस्तानच्याच आश्रयाला येतात हे कसे? याचे उत्तर पाकिस्तानच्या बिनडोक राज्यकर्त्यांना देता आले नाही. अमेरिकेवर हल्ला करणारा अल् कायदाचा म्होरक्या लादेन पाकिस्तानातच लपून बसला होता. अमेरिकेच्या कमांडोजनी
पाकिस्तानात घुसून
लादेनला मारले. ‘लादेन पाकिस्तानात नाही. पाकिस्तानात कोणताही दहशतवादी नाही,’ असे सांगणाऱ्या पाकिस्तानचा मुखवटा अशा प्रकारे अनेकदा फाडला गेला. हिंदुस्थानवरील दहशतवादी हल्ल्यांचे सूत्रधार मौलाना मसूद अझहर, हाफिज सईद हे पाकिस्तानातच आश्रयाला आहेत. भारताच्या या गुन्हेगारांना भारताच्या हवाली करण्यातच पाकिस्तानचे हित होते, पण पाकिस्तानने ते केले नाही. या सर्व दहशतवाद्यांना ‘स्वातंत्र्यसैनिकांचा’ दर्जा देण्याचा नादानपणा त्यांनी केला. पहलगाम हल्ल्यात स्वातंत्र्यसैनिकांचा हात असावा असे पांचट विधान पाकच्या मंत्र्यांनी केले. पाकिस्तान हा देश म्हणून कधीच उदयाला आला नाही. धार्मिक द्वेषातून निर्माण झालेला धर्मांधांचा अड्डा एवढेच पाकिस्तानबाबत म्हणावे लागेल. समोरासमोरच्या युद्धात पाकिस्तान कधीच जिंकणार नाही. त्यामुळे दहशतवाद्यांना रसद पुरवून भारतात हल्ले घडविण्याचा मार्ग त्यांनी स्वीकारला. तीन युद्धांत भारताने पाकिस्तानची धूळधाण करूनही त्यांचे शेपूट सरळ झाले नाही. भारतीय सैन्य हे जगातील सर्वोत्तम सैन्य आहे आणि संकटसमयी राजकीय मतभेद विसरून देश एकवटतो हे चित्र पहलगाम हल्ल्यानंतर पुन्हा दिसले. राजकारण करण्याचे जे अनेक मार्ग आहेत, त्यापैकी युद्ध हा एक मार्ग आहे. युद्ध या उपायाचा अवलंब केव्हा ना केव्हा तरी करावाच लागतो. पाकिस्तानसारखी राष्ट्रे जोपर्यंत अस्तित्वात आहेत, तोपर्यंत जगात कुठे ना कुठे तरी युद्धाचा भडका होतच राहणार. भारत हा बुद्धाचा देश आहे, पण कोणी आमच्या निरपराध नागरिकांचे प्राण नाहक घेत असेल तर बुद्धाला नमस्कार करून युद्धाचा मार्ग स्वीकारावा लागतोच. युद्ध म्हणजे फार
मोठे पाप
आहे आणि शांतता, संयम म्हणजे फार मोठे पुण्य आहे असे ज्यांना वाटते त्यांनी त्या 26 अभागी बहिणींचे उजाड झालेले कपाळ पाहायला हवे. त्यामुळे भारताला राष्ट्रहितासाठी पाकड्यांवर बॉम्ब टाकावे लागले. पाकिस्तानची लढण्याची क्षमता नाही. चीनसारख्या राष्ट्रावर पाकिस्तानची युद्धनीती अवलंबून आहे. चीनने पाकिस्तानला काही लढाऊ विमाने पुरवली. त्यातले ‘जेएफ-17’ हे फायटर विमान भारताने पहिल्याच दिवशी पाडले. पाकिस्तानचे पाय आताच लटपटताना दिसत आहेत. अद्याप युद्ध सुरू व्हायचे आहे. आता फक्त दहशतवादी तळांवरच हल्ले झाले. पाकच्या नागरी वस्त्यांवर आणि सैन्य तळांवर हल्ले झाले नाहीत. मसूद अजहर आणि हाफिज सईद यांनाच लक्ष्य केले आहे. मसूद अजहरचे नातेवाईक कालच्या हल्ल्यात मारले गेले व त्यानंतर त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. निरपराध्यांचे बळी घेणाऱया या नराधमाच्या डोळ्यांतून अश्रू वाहताना पाहून पहलगाममध्ये बळी पडलेले ‘आत्मे’ भारतीय सैन्यावर फुले उधळत असतील. हाफिज सईद, मसूद अजहरसारख्यांचा पूर्ण खात्मा हेच भारतीय सैन्याचे ‘टार्गेट’ असायला हवे. पाकिस्तान एक राष्ट्र राहिलेले नसून जगाला भार ठरलेली दहशतवाद्यांची भूमी बनली आहे. त्यांचा समूळ नायनाट करणे हे आता आवश्यक आहे. किती निरपराध्यांचे बळी जाणार? किती मायभगिनींचे कुंकू पुसणार? आता या सगळ्याचा शेवट व्हायला हवा. दहशतवाद्यांचे आठ-नऊ तळ उद्ध्वस्त झाले तरी पाकिस्तान म्हणजे दहशतवादी निर्माण करणारी फॅक्टरी आहे, ही फॅक्टरीच नष्ट झाली पाहिजे. भारतीय सैन्याने त्या दिशेने पावले टाकली आहेत. संपूर्ण देश भारतीय सैन्याला मानवंदना देत आहे. तुमच्या शौर्याला सलाम!