आजचा अग्रलेख : सुबोध भावे का संतापले? मायबाप, असे वागू नका!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
subodh-bhave

रसिकतेचे वरदान महाराष्ट्राला लाभले आहे. टिळकांपासून यशवंतराव चव्हाणांपर्यंत आणि आचार्य अत्र्यांपासून ते बाळासाहेब ठाकरे यांच्यापर्यंत सर्व मोठे लोक ‘रसिक’ म्हणून नाटकांचा आस्वाद घेत राहिले. त्याच महाराष्ट्रात नाटकाचा प्रयोग कसा पाहावा आणि त्याचे रसग्रहण कसे करावे हे प्रेक्षकांना समजावून सांगण्याची वेळ यावी याचे आश्चर्य वाटते. सुमित राघवन, सुबोध भावे हे रंगभूमीचे पुजारी आहेत. सुमित यांच्या नंतर सुबोध भावे का संतापले, हे समजून घेतले पाहिजे. रंगभूमीच्या ‘भक्तां’नी मर्यादा पाळायला हव्यात. मायबाप प्रेक्षकांनो, असे वागू नका! नाहीतर रंगदेवतेचे शाप संपूर्ण महाराष्ट्राला लागतील. नाटक ही महाराष्ट्राची ओळख आहे हे विसरता येणार नाही.

मराठी माणूस हा नाटकवेडा आहे. आजही आपण रंगभूमीचे पावित्र्य आणि प्रतिष्ठा जपण्याचा प्रयत्न करीत आहोत, पण ‘डिजिटल इंडिया’चा अर्थ न समजलेल्या काही मंडळींमुळे रंगभूमीवर व्यत्यय येत आहे. नाटकाचा प्रयोग रंगला असतानाच काही प्रेक्षक ‘मोबाईल घंटी बजाव आंदोलन’ सुरू करतात व त्यामुळे नाटकाच्या रंगलेल्या प्रयोगाचा भंग झाल्याची उदाहरणे रोज घडत आहेत. प्रख्यात रंगकर्मी सुबोध भावे यांनी याबाबत आता संताप व्यक्त केला आहे. याआधी सुमित राघवन यांच्यावर अशीच वेळ आली होती. गेल्या महिन्यात नाशिक येथे ‘नॉक नॉक सेलिब्रिटी’ या नाटकाचा प्रयोग ऐन रंगात आला असताना प्रेक्षकांच्या मोबाईलच्या रिंग वाजत होत्या. हे बराच वेळा झाल्याने संतापलेल्या सुमित यांच्यावर नाटकाचा प्रयोगच थांबवण्याची वेळ आली होती. अर्थात, नंतर त्यांनी पुन्हा प्रयोग सुरू करून पूर्ण केला होता. मात्र नाटय़ रसिकांची बेशिस्त त्यावेळीही चव्हाटय़ावर आली होतीच. मराठी रंगभूमीला हे असले प्रकार लांच्छनास्पद आहेत. सुबोध भावे सध्या ‘अश्रूंची झाली फुले’ करीत आहेत. वसंत कानेटकरांचे हे नाटक मराठी रंगभूमीवर दीपस्तंभाप्रमाणे उभे आहे. जुनी अजरामर नाटके नव्या संचात त्याच ताकदीने नव्या पिढीसमोर आणण्याचे काम नव्या संस्था व नट मंडळी करीत आहेत. त्यांचे कौतुक आम्हाला आहे, पण नवे प्रेक्षक हातात ‘मोबाईल’ घेऊन प्रयोगादरम्यान वेगळ्याच ‘निर्मिती’त व ‘कार्यात’ मग्न असतात. रंगमंचावर

नट मंडळी संहितेत प्राण ओतत

असताना मोबाईलची घंटी वाजते व रंगमंचाचा विरस होतो. ‘अश्रूंची झाली फुले’ नाटकाचा प्रयोग शनिवारी कल्याणला आचार्य अत्रे रंगमंदिरात होता. रविवारी ‘अश्रू…’चा प्रयोग रवींद्र नाटय़ मंदिरात झाला. रवींद्र नाटय़ मंदिरातील प्रयोगादरम्यान फोनचा व्यत्यय येऊ नये यासाठी तिसऱया घंटेच्या आधी भावे यांनी प्रेक्षकांना फोन सायलेंट मोडवर ठेवा किंवा बंद करा, असे आवाहन करूनही प्रेक्षकांचे फोन वाजत राहिले. हा सर्वच प्रकार मराठी प्रेक्षकांच्या रसिक परंपरेस शोभणारा नाही. सुबोध भावे हे चित्रपट, टी.व्ही. मालिकांवरील लोकप्रिय अभिनेते आहेत. सुमित राघवन यांचेही तेच स्थान असले तरी या सर्व कलावंतांची नाळ मराठी रंगभूमीशी जोडली आहे व ते झपाटल्यासारखे रंगभूमीवर दर्जेदार प्रयोग करीत आहेत. जुनी-जाणती नट मंडळी प्रेक्षकांचा उल्लेख ‘मायबाप’ असा आदराने करीत. याच मायबापांनी नाटक जगवले व कलाकारांचे लाड पुरवले, पण नवी पिढी नाटकाकडे ‘टाइमपास’ म्हणून पाहते काय? सुबोध भावे म्हणतात, ‘‘अनेक वेळा सांगून, विनंती करूनही जर नाटक चालू असताना मोबाईल वाजत असतील तर त्याचा अर्थ असा की, आपल्या नाटकात काहीतरी कमी आहे किंवा नाटक संपूर्ण एकरूप होऊन बघण्याची गरज प्रेक्षकांना वाटत नाही. यावर एकच उपाय, तो म्हणजे नाटकात काम न करणे. म्हणजे त्यांच्या

फोनमध्ये आमची लुडबूड

नको. कारण फोन जास्त महत्त्वाचा.’’ सुबोध भावे यांच्या भावनांचा हा उद्रेक म्हणजे एका नटाचा तळतळाट आहे. हाच उद्रेक सुमित राघवन यांनीही व्यक्त केला. ते तर संतापून विंगेत गेले. जीवन ही एक रंगभूमी आहे, पण रंगभूमी म्हणजे चित्रपट नव्हे. चित्रपटाच्या चित्रीकरणात ‘रिटेक’ म्हणजे एखादा प्रसंग पुनः पुन्हा चित्रित करण्याची संधी असते. नाटय़ प्रयोगात तसे नसते. तिथे मायबाप प्रेक्षकांसमोर उधारी चालत नाही. हिशेब रोकड्यात करावा लागतो. टाळ्या, हशा, अश्रू रोकड्यात मिळतात तशा फसलेल्या प्रयोगांना शिव्याही मिळतात. हशा आणि टाळ्यांनी जी नाटय़गृहे दणाणून गेली ती नाटय़गृहे आता मोबाईलच्या घंटानादांनी शिस्त बिघडवत आहेत. रसिकतेचे वरदान महाराष्ट्राला लाभले आहे. टिळकांपासून यशवंतराव चव्हाणांपर्यंत आणि आचार्य अत्र्यांपासून ते बाळासाहेब ठाकरे यांच्यापर्यंत सर्व मोठे लोक ‘रसिक’ म्हणून नाटकांचा आस्वाद घेत राहिले. त्याच महाराष्ट्रात नाटकाचा प्रयोग कसा पाहावा आणि त्याचे रसग्रहण कसे करावे हे प्रेक्षकांना समजावून सांगण्याची वेळ यावी याचे आश्चर्य वाटते. सुमित राघवन, सुबोध भावे हे रंगभूमीचे पुजारी आहेत. सुमित यांच्या नंतर सुबोध भावे का संतापले, हे समजून घेतले पाहिजे. रंगभूमीच्या ‘भक्तां’नी मर्यादा पाळायला हव्यात. मायबाप प्रेक्षकांनो, असे वागू नका! नाहीतर रंगदेवतेचे शाप संपूर्ण महाराष्ट्राला लागतील. नाटक ही महाराष्ट्राची ओळख आहे हे विसरता येणार नाही.