
भारतरत्न सचिन तेंडुलकरच्या नावाचा गैरवापर होत असल्याचा आरोप क्रिकेट सुधारणा समितीचे चेअरमन लालचंद राजपूत यांच्याकडून यावेळी करण्यात आला आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (एमसीए) अध्यक्ष विजय पाटील यांना याबाबत त्यांनी पत्र लिहून कळवले आहे. क्रिकेट सुधारणा समिती सध्या मुंबईच्या विविध वयोगटांतील कोचेस व निवड समिती सदस्यांच्या निवडीसाठी मुलाखती घेत आहे, पण या निवडीत सचिन तेंडुलकरच्या नावाचा गैरवापर करून हस्तक्षेप करण्यात येत आहे, असे स्पष्ट अन् परखड मत लालचंद राजपूत यांच्याकडून यावेळी व्यक्त करण्यात आले आहे.
एमसीएकडून क्रिकेट सुधारणा समिती सदस्यांची निवड काही दिवसांपूर्वीच करण्यात आली. यामध्ये लालचंद राजपूत, समीर दिघे व राजू कुलकर्णी यांचा समावेश करण्यात आला. या समितीने बुधवारी विविध वयोगटांसाठी 24 कोचेसच्या मुलाखती घेतल्या. त्यानंतर एमसीएमधील सदस्य अमित दाणी याने सचिन तेंडुलकरचे नाव पुढे करीत विशिष्ट व्यक्तींची निवड करण्यात यावी यासाठी क्रिकेट सुधारणा समितीकडे आग्रह धरला. त्यामुळे लालचंद राजपूत संतापले आणि एमसीएकडे याबाबत तक्रार केली अशी माहिती सूत्रांकडून यावेळी देण्यात आली.
सचिनबद्दल आदर, तो थेट संपर्क साधू शकतो
सचिन तेंडुलकर आयकॉन आहे. त्याच्याबद्दल आम्हालाच नव्हे, समस्त देशवासीयांना कमालीचा आदर आहे, पण त्याचे नाव पुढे करीत अमुक व्यक्तीची कोच किंवा इतर पदांसाठी निवड करा असे म्हणणे चुकीचे आहे. सचिन तेंडुलकरला एखादा मुद्दा मांडायचा असल्यास तो थेट एमसीए किंवा क्रिकेट सुधारणा समितीशी संपर्क साधू शकतो. तो आम्हा सर्वांना ओळखतो असे स्पष्ट मत लालचंद राजपूत यांनी एका दैनिकाशी संवाद साधताना व्यक्त केले.
हा तर गैरसमज
अमित दाणीला याबाबत विचारले असता तो म्हणाला, कोणत्याही व्यक्तीच्या शिफारसीसाठी सचिन तेंडुलकरच्या नावाचा वापर मी का करीन? सचिन तेंडुलकरला माझ्या मध्यस्थीची गरज काय? तो थेट एमसीएशी संपर्क साधू शकतो. माझ्यात आणि क्रिकेट सुधारणा समितीत गैरसमज झाला आहे, असे तो पुढे एका दैनिकाशी संवाद साधताना म्हणाला.


























































