लॉर्ड्स संग्रहालयात क्रिकेटच्या देवाचे तैलचित्र, तिसऱ्या कसोटीपूर्वी सचिन तेंडुलकरचा दुहेरी सन्मान

हिंदुस्थानचा महान खेळाडू सचिन तेंडुलकरचा हिंदुस्थान-इंग्लंडदरम्यानच्या तिसऱया कसोटी क्रिकेट सामन्यादरम्यान गुरुवारी (दि.10) दोन वेळा सन्मान करण्यात आला. ‘क्रिकेटची पंढरी’ असलेल्या ओळखल्या जाणाऱया लॉर्ड्स संग्रहालयात ‘क्रिकेटचा देव’ अर्थात सचिन तेंडुलकरच्या तैलचित्राचे त्याच्याच हस्ते अनावरण करण्यात आले. मग लॉर्ड्स मैदानावर लावलेली घंटादेखील सचिनच्या हस्तेच वाजवून सामन्याचा प्रारंभ झाला.

अॅण्डरसन-तेंडुलकर मालिकेतील तिसरी कसोटी लॉर्ड्स मैदानावर आजपासून सुरू झाली. या कसोटीपूर्वी ‘क्रिकेटचा देव’ म्हणून ओळखल्या जाणाऱया सचिन तेंडुलकरचा लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंड व एमसीसी यांच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. लॉर्ड्स संग्रहालयात सचिनचे एक जुने तैलचित्र लावण्यात आले आहे. या तैलचित्रावरील पडदा सचिनच्याच हस्तेच हटविण्यात आला. यामध्ये सचिनच्या अंगावरील जर्सी खूप जुनी आहे. या विश्वविक्रमादित्य फंलंदाजाने लॉर्ड्स मैदानावर एपूण 5 सामने खेळले असून यात केवळ 195 धावा केलेल्या आहेत. यामध्ये 37 ही त्याची सर्वेत्तम धावसंख्या होय. या सन्मानानंतर सचिनने लॉर्ड्स मैदानावरील विशाल घंटा वाजवली अन् मग त्याच्याच नावाने सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील तिसऱया सामन्याचा प्रारंभ झाला. सचिन तेंडुलकर एकाच दिवशी दोन सन्मानांचा मानकरी ठरला हे विशेष.

लॉर्ड्सवरील सन्मानाने सचिन भारावला

क्रिकेटची पंढरी असलेल्या लॉर्ड्सच्या संग्रहालयात चक्क स्वतःचेच तैलचित्र पाहून सचिन तेंडुलकर भावुक झाला. त्याच्या मनात लागलीत भूतकाळातील आठवणींनी फेर धरला. मग सचिनने सोशल मीडियावर आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. तो म्हणाला, ‘लॉर्ड्सवरील हा सन्मान माझ्या कारकिर्दीतील संस्मरणीय क्षण होय. हिंदुस्थानने 1983 साली याच लॉर्ड्स मैदानावर जगज्जेतेपदाचा करंडक जिंपून इतिहास घडविला होता, कर्णधार कपिल देव यांना याच मैदानावर करंडक उंचावताना पह्टोत बघितले होते. अन् येथूनच खऱया अर्थाने माझा क्रिकेटचा प्रवास सुरू झाला. मग किशोर वयात 1988 मध्ये प्रथमच ‘याचि देही याचि डोळा’ लॉर्ड्स मैदान बघण्याचे भाग्य लाभले. नंतर टीम इंडियासोबत या मैदानाच्या अंगाखांद्यावर खेळलो. आज या ऐतिहासिक लॉर्ड्सच्या संग्रहालयात माझेच तैलचित्र बघून धन्य झालो. असं वाटतंय, आता खरंच माझ्या क्रिकेट प्रवासाचं वर्तुळ पूर्ण झालं.