राजमाता सत्वशीलादेवी भोसले यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

सामना ऑनलाईन | सावंतवाडी

सावंतवाडी संस्थानच्या राजमाता सत्वशीलादेवी भोसले यांचे बुधवारी रात्री सावंतवाडी येथे वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ८६ वर्षांच्या होत्या. राजमाता सत्वशीलादेवी गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. त्यांना उपचारासाठी बेळगावच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर घरी आणल्यानंतर बुधवारी त्यांचे निधन झाले.

बडोद्याच्या राजघराण्यातील सत्वशीलादेवी यांचा विवाह सावंतवाडी संस्थानचे शिवरामराजे भोसले यांच्याशी झाला. शिवरामराजे भोसले आणि राजमाता सत्वशीलादेवी यांनी १९६०च्या दशकात कलेच्या दूरवस्थेकडे लक्ष वेधण्याचे काम केले. त्यांच्या राजाश्रयामुळेच सावंतवाडीतील लाकडी खेळण्यांच्या ऊद्योगाला नवचैतन्य प्राप्त झाले.

लाकडी खेळणी उद्योगाला नवजीवन दिले
राजमाता सत्वशीलादेवी यांनी सावंतवाडी संस्थानातील परंपरागत लाकडी खेळणी उद्योगाला चालना दिली. त्यासाठी त्या स्वतः अशी खेळणी बनवायला शिकल्या. या कलेच्या माध्यमातून तबके ,पेले ,निरंजन, पूजेचे पॅट ,उदबत्ती स्टॅन्ड आणि देव्हारे अशा लाकडाच्या वस्तूंचे मोठे उत्पादन सावंतवाडीत होऊ लागले. सत्वशीलादेवी यांनी १९७१ मध्ये सावंतवाडी लॅकर वेअर्स या संस्थेच्या माध्यमातून लाकडी खेळणी कलेला जर्मनी, सिंगापूर अशा देशांतही पोचवले. या प्रकारात स्वतः संशोधन करीत त्यांनी या कलेला वैभव प्राप्त करून दिले.