श्री साईबाबा वस्तुसंग्रहालय, ध्यानमंदिर भक्तांसाठी खुले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

श्री साईबाबा संस्थानचे श्री साईबाबा वस्तुसंग्रहालय आणि ध्यानमंदिर आजपासून साईभक्तांसाठी खुले करण्यात आले आहे. सकाळी 6 ते रात्री 9 या वेळेत भक्त भेट देऊ शकतात, अशी माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली.

साईबाबांनी हाताळलेल्या वस्तूंबाबत भक्तांना माहिती व्हावी याकरिता मंदिर परिसरातील दीक्षितवाड्यामध्ये हे वस्तुसंग्रहालय उभारण्यात आले आहे. या संग्रहालयात श्रींनी वापरलेले जोडे, कफनी, चिलिम, उशा, गादी, रथ, पालखी, पलंग अशा अनेक वस्तू ठेवण्यात आलेल्या आहेत. तसेच श्री साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना ध्यान, साधना व नामस्मरण करता यावे, यासाठी श्रीसाई सत्यव्रत हॉलच्या पहिल्या मजल्यावर नव्याने ध्यानमंदिर तयार करण्यात आले आहे.

साईभक्त व ग्रामस्थांच्या मागणीनुसार आजपासून वस्तुसंग्रहालय व ध्यानमंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. भाविकांना दोन्ही ठिकाणी कोरोना नियमांप्रमाणे प्रवेश दिला जाणार आहे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी सांगितले.