अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांचा साई जीवनदूत पुरस्काराने गौरव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अपघातावेळी जखमींना तातडीने रुग्णालयात पोहोचविण्याचे महत्त्वाचे काम करणाऱ्या समाजसेवींचा शिर्डी पोलीसांच्या वतीने साई जीवनदूत पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांच्या प्रयत्नातुन साईनगरी शिर्डीत या उपक्रमाचा श्रीगणेशा करण्यात आला. राज्यातील हा पहीलाच प्रयोग आहे.

अपघाताचे प्रमाण वाढल्याने अनेकांचा यात बळी जात आहे. अनेकदा अपघात झाल्यानंतर जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी कोणीही पुढे येत नाही. आपण मदत केल्यास पोलीसांच्या चौकशीला सामोरे जावे लागेल, अशी भीती अनेकांना वाटत असते. हे चित्र बदलण्यासाठी अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळावी यासाठी शिर्डी वाहतूक शाखेच्या प्रयत्नातून अपघातावेळी मदत करणाऱ्या समाजसेवकांचा साई जीवनदूत पुरस्काने सन्मान करण्याची संकल्पना उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे,वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक नितिनकुमार गोकावे यांनी साईनगरीत राबविण्यासाठी पुढाकार घेतला. त्याची मुहुर्तमेढ या पुरस्कार वितरण सोहळ्याने रोवली गेली. राज्यातील हा पहीलाच प्रयोग शिर्डीतून सुरु झाला आहे.

पहिल्या साई जीवनदुत पुरस्काराचे मानकरी अशोक भाऊसाहेब गायके, पोलीस कॉन्स्टेबल शिरसाठ, भाऊ जगताप, अमित साहेबराव खोकले हे समाजसेवक ठरले. त्यांना साईसंस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे, नगराध्यक्षा अर्चना कोते, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, नगरसेवक सुजित गोंदकर, सामाजिक कार्यकर्ते मनोज लोढा यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. साईबाबा सुपर हॉस्पिटलचे न्यूरो सर्जन डॉ. प्रसाद उंबरकर यांनी अपघातग्रस्थांचे प्राण वाचविण्यासाठी रुग्णालयात मोलाची कामगिरी केली. तसेच 108 रुग्णवाहीची तातडीने सेवा देणाऱ्या श्रीमती कांचन बिडवे,अनिल डांगे यांचा यावेळी गौरव करण्यात आला.

शिर्डी पोलीसांनी अतिशय चांगला उपक्रम सुरु केला आहे. यामुळे अपघात समयी जखमींना तातडीने मदत करण्यासाठी युवापिढीस प्रेरणा मिळेल. साईसंस्थानच्या रुग्णालयात अपघात ग्रस्तांना तातडीची वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी विशेष डाँक्टरांची टीम तयार करुन ती कायम स्वरुपी तत्पर ठेवण्यात येईल. राज्यातील हा पहिला उपक्रम असुन यामुळे अपघातग्रस्तांना जीवदान मिळण्यास मोठी मदत होईल, असे -साईसंस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी सांगितले. अपघात ग्रस्थांना मदत करणाऱ्या नागरिकांना पोलीस ठाण्यात कुठल्याही प्रकारच्या चौकशीसाठी बोलावणार नाही. त्यांच्या प्रामाणिक कामाचे कौतुक म्हणून यापुढे त्यांना साई जीवनदूत ह्या पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल.अपघातस्थळी तरुणांना पुढे येऊन जखमींना तातडीने रुग्णालयात नेण्याचे मोलाचे काम करावे. यामुळे आपण अनेक जखमींना जिवदान देऊ शकतो असे शिर्डीचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी सांगितले.