
शिर्डीत प्रामुख्याने वर्षभरात रामनवमी, गुरुपौर्णिमा आणि दसरा हे मुख्य उत्सव साई संस्थानकडून साजरे करण्यात येतात. या तीनही उत्सवात भाविक साईचरणी कोट्यवधींची देणगी देतात. मात्र, यावर्षी कोरोनामुळे साई संस्थानच्या देणगीत मोठी घट झाली आहे. नुकताच साजरा झालेल्या साई पुण्यतिथी उत्सवात केवळ 38 लाख 10 हजार 832 रुपयांची देणगी संस्थानला प्राप्त झाली आहे.
नुकताच शिर्डीत दसरा अर्थात साईंचा पुण्यतिथी उत्सव साजरा करण्यात आला. या तीन दिवसांत भक्तांनी साईचरणी केवळ 38 लाख 10 हजार 832 रुपयांचे दान अर्पण केले आहे. हा आकडा मागच्या वर्षीच्या तुलनेत अत्यंत कमी आहे.
या वर्षी साई पुण्यतिथी उत्सवात तीन दिवसांत मिळालेले दान
- ऑनलाइन पद्धतीने 28 लाख 63 हजार रुपयांचे दान
- साई मंदिराच्या चार क्रमांक गेटजवळील देणगी काऊंटरवर 4 लाख 58 हजारांची रोख देणगी
- हैदराबाद येथील साईभक्त सुनील शहा यांच्याकडून 1515 ग्रॅम वजनाची सुमारे 91 हजार रुपयांची चांदीची परडी संस्थानला देणगी
- न्यूझीलंड, कॅनडा, अमेरिका, इंग्लंड येथील भाविकांनी 42 हजार 826 रुपयांची ऑनलाइन देणगी.
- पुण्यतिथी उत्सवाच्या मुख्य दिवशी रुढी-परंपरेनुसार आयोजित करण्यात आलेल्या प्रतीकात्मक भिक्षा झोळीत 3 लाख 55 हजार 580 रुपयांचे कडधान्य तसेच रोख स्वरूपात देणगी.





























































