
उसनवारीने दिलेले पैसे परत मागितले असता, जीवे मारण्याची धमकी दिल्याने शिर्डी शहरातील श्री साईबाबा संस्थान कर्मचाऱ्याने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी 11 जणांच्या नावांची चिठ्ठी लिहून ठेवली आहे. विकास रामचंद्र दिवटे (वय 37, रा. निमगाव कोऱहाळे, शिर्डी) असे मृताचे नाव आहे.
विकास दिवटे हा साई संस्थानच्या बगिचा विभागात काम करीत होता. गुरुवारी (दि. 9) त्याने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. विकासने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या पत्नीच्या नावे एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे. त्यामध्ये आपल्या मित्रांना, तसेच इतरांना मिळून 11 जणांना लाखो रुपये उसनवार दिले असल्याचे म्हटले आहे. तसेच या चिठ्ठीत नावे आणि मोबाईल नंबर लिहून ठेवले आहेत. मृत विकास याला धमकी दिल्याचेही मोबाईलमध्ये नमूद असल्याचे सांगण्यात आले आहे.
शिर्डी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला आहे. पोलिसांकडून कारवाई होत नाही तोपर्यंत मृत विकासच्या नातेवाईकांनी घरामध्ये मृतदेह झाकून ठेवला होता. पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांना ही गोष्ट समजताच त्यांनी ‘आरोपींवर शंभर टक्के कारवाई करण्यात येईल,’ असे आश्वासन दिल्यानंतर विकासचा अंत्यविधी करण्यात आला.






























































