
पोलिसांनी शुक्रवारी सैफ हल्ला प्रकरणात प्रत्यक्षदर्शी तसेच सैफची पत्नी करिना कपूर हिचा जबाब नोंदविला. हल्लेखोर प्रचंड आक्रमक होता. पण त्याने दागिन्यांना हात लावला नाही, असा जबाब जखमी सैफ अली खानची पत्नी करिना कपूर-खान हिने पोलिसांना दिला. सैफच्या धाडसामुळेच हल्लेखोर आपल्या मुलापर्यंत पोहोचू शकला नाही, याची किंमत त्याला मोजावी लागल्याची ती म्हणाली.
गुरुवारी पहाटे सैफवर त्यांच्या घरात घुसून प्राणघातक हल्ला झाला होता. हा हल्ला चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या चोराने केला असे म्हंटले जात होते. परंतु आता करिना हिने पोलिसांना दिलेला जबाब समोर आला आहे. हल्लेखोराने चाकूचा धाक दाखवून नर्स लिमाकडे एक कोटीची मागणी केली. चाकू घेऊन असलेल्या त्या तरुणाला पाहून आम्ही सर्वच घाबरलो होतो. आमची नजर पडताच तो आक्रमक झाला आणि लिमा तसेच सैफवर वार केले. मात्र त्याने घरातील कोणत्याही मौल्यवान वस्तूंना किंवा दागिन्यांना हात लावला नाही. घरातील दागिने अथवा कोणतीही वस्तू त्याने चोरली नाही. तो सैफवर वार करून तसाच निघून गेला, असे करिनाने जबाबत म्हटले असल्याचे सूत्रांनी सांगितले.
संशयिताला छत्तीसगडमधून ताब्यात घेतले
सैफ अली खान याच्यावर हल्ला करणारा आरोपी घटना घडून तीन दिवस उलटले तरी पोलिसांच्या हाती लागलेला नाही. शनिवारी रात्री उशिरापर्यंत पोलीस आरोपीला शोधतच होते. पोलिसांनी काही संशयितांना आपल्या रडारवर घेतले असून त्यांची चौकशी केली जात आहे. तर छत्तीसगडच्या दुर्गजवळ ज्ञानेश्वरी एक्प्रेसमधून तेथील आरपीएफ जवानांनी मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीच्या आधारे एकाला ताब्यात घेतले. त्या संशयिताला मुंबईत आणून त्याची चौकशी करण्यात येणार आहे. चौकशीअंती तो आरोपी आहे की नाही ते स्पष्ट होईल.