
सामना प्रतिनिधी । पाथर्डी
जानेवारी समाजाने संतांना कितीही त्रास दिला तरीही संत हे समाजाला ज्ञान व प्रेमच देत असल्याचे मत भगवान गडाचे मठाधिपती डॉ. नामदेवशास्त्री यांनी व्यक्त केले. श्री क्षेत्र भगवानगडाचे संस्थापक भगवानबाबा यांचा ५४ वा पुण्यतिथी सोहळा श्री क्षेत्र भगवानगडावर आज मोठ्या उत्सहात संपन्न झाला. यावेळी आयोजित केलेल्या काल्याच्या कीर्तनप्रसंगी ते बोलत होते. या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे गडावर आयोजन करण्यात आले होते तर या दिवशी संभाजीनगर ते भगवानगड या दिंडीची सुरवात भगवान महासंघाचे मुख्य प्रवर्तक बाळासाहेब सानप यांनी केली. या वेळी केदारेश्वर कारखान्याचे अध्यक्ष प्रताप ढाकणे, बाळासाहेब सानप, दादासाहेब मुंडे व राज्याच्या विविध भागातून आलेले भाविक मोठ्या संख्येने उपस्थीत होते. दरवर्षी प्रमाणे असलेला पोलीस बंदोबस्त मात्र आज गडावर कुठेही नव्हता.
या वेळी बोलताना नामदेवशास्त्री म्हणाले की, “ संत हे समाजाला अज्ञान आणि अंधश्रद्धेपासून दूर करतात. ज्याप्रमाणे लहान लेकरु आपल्या अज्ञानामुळे आईला त्रास देतं; परंतु आई मात्र त्याला प्रेमच देते. त्याप्रमाणे समाजाने संतांना कितीही त्रास दिला तरी संत हे समाजाला ज्ञान आणि प्रेमच देतात. समाजाने माऊली ज्ञानोबारायांना त्रास दिला; माऊलींनी समाजाला ज्ञानेश्वरी दिली. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांना समाजाने त्रास दिला; जगद्गुरू तुकोबारायांनी समाजाचा माथा सुधारावा म्हणून समाजाला गाथा दिला. नाथ महाराजांनी भागवत दिला. श्री संत भगवानबाबांना नारायणगडावर ज्यांनी त्रास दिला; तेच लोक भगवानगडावर शरण आल्यानंतर बाबांनी त्यांचे फेटा बांधून स्वागत केले होते” असे सांगत त्यांनी संत भगवानबाबांच्या शैक्षणिक, आध्यात्मिक व सामाजिक कार्याची माहिती विशद केली.





























































