चव्हाण यांच्या हत्येशी आपला संबंध जोडणं चूक!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

लातूरमधील क्लासचे संचालक अविनाश चव्हाण यांच्या हत्येच्या कटात सहभागी असलेल्या आरोपींमध्ये करणसिंह धैरवाल याचाही समावेश आहे. धैरवाल हा  लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांचा खासगी अंगरक्षक आहे. निलंगेकर आणि धैरवाल यांचे फोटो सध्या सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहेत. धैरवाल हा निलंगेकरांचा खाजगी सुरक्षा रक्षक असेल तर मग या प्रकरणातील आरोपींना शिक्षा कशी होऊ शकेल, ते पोलिसांवर आणि न्याययंत्रणेवर दबाव टाकून  सहज मोकळे सुटू शकतात अशी टीका या सोशल मिडीयावर व्हायला लागली होती. या टीकेमुळे संभाजी पाटील-निलंगेकर यांना प्रसिद्धीमाध्यमांसमोर येऊ खुलासा करावा लागला. या खुलाशामध्ये त्यांनी म्हटलंय की  यात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई झालीच पाहीजे.

पालकमंत्री निलंगेकर आणि  धैरवाल यांचे फोटो व्हायरल झाल्यानंतर निलंगेकरांकडे देखील अनेक जण संशयाच्या नजरेतून बघायला लागले होते. यावर बोलताना निलंगेकर म्हणाले की ‘कार्यकर्त्यांच्या मनात काय असतं हे सांगता येणं कठीण असतं. इंदिरा गांधी यांचे मारेकरी हे देखील सुरक्षा रक्षक होते, त्यांच्याही मनातील भावना कळाल्या नव्हत्या.’ या घटनेनंतर लातूरमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाल्याचंही निलंगेकर यांनी कबूल केलं आहे. हे वातावरण निवळावं यासाठी सगळ्या दोषींना गजाआड केलं पाहीजे आणि त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहीजे असं मत संभाजी पाटील-निलंगेकर यांनी व्यक्त केलं आहे.