
सामना ऑनलाईन, मुंबई
सलग चौथ्या दिवशी मुंबईला झोडपून काढणाऱ्या पावसाचा भाजपच्या नेत्यांनाही जबरदस्त फटका बसला. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबीत पात्रा यांच्यावर मुसळधार पावसामुळे दादरच्या भाजप कार्यालयातील नियोजित पत्रकार परिषद रद्द करण्याची नामुष्की ओढवली. त्यामुळे त्यांना आपोआपच रजा मिळाली. त्याचवेळी मुंबईत काही ठिकाणीच पाणी साचले असून सर्वच शाळांना सुट्टी देण्याची गरज नसल्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी जाहीर केले. दरम्यान, पात्रा यांना रजा मिळाली, मात्र विनोद तावडे यांच्या घोषणेमुळे शाळकरी मुलांचे प्रचंड हाल झाले. त्यांना कमरेइतक्या पाण्यातून वाट काढत शाळा गाठाव्या लागल्या.
संबीत पात्रा यांच्याबरोबर यावेळी भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये हे देखील होते. त्यांनाही पात्रा यांच्याबरोबर पाण्यातून चालतच जावे लागले. दादर येथील भाजप कार्यालयात आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. परंतु मुंबईत सकाळपासूनच जोरदार पाऊस पडत असल्यामुळे हिंदमाता परिसरात गुडघाभर पाणी साचले, परंतु तरीही पत्रकार परिषद घेणारच या हट्टाला पेटलेल्या भाजप प्रवक्त्यांना भाजप कार्यालयाच्या ठिकाणीच मुंबईतील मुसळधार पावसाचा चांगलाच प्रत्यय आला आणि त्यांना आल्यापावली माघारी फिरावे लागले. पत्रकार परिषद घेण्यासाठी जेव्हा स्वतः पात्रा आणि उपाध्ये हिंदमाता परिसरात आले तेव्हा पात्रांना स्वतःचेच बूट हातात घेऊन पाण्यातून वाट काढावी लागली. तत्पूर्वी, येथील परिस्थिती पाहून त्यांनी पत्रकार परिषद रद्द केल्याचे जाहीर केले.




























































