
सामना ऑनलाईन । राहुरी
गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने राहुरीच्या दरडगाव म्हैसगाव हद्दीतील मुळा नदीपात्रात छापा टाकुन वाळुचा चोरट्या मार्गाने उपसा करणारी 21 लाख 40 हजार रूपयांची वाहने व वाळु तस्करी करणा-यांना ताब्यात घेतले आहे. राहुरीच्या महसूल व पोलीस प्रशासनाला या कारवाईची भणक देखील लागली नसल्याने राहुरीच्या स्थानिक प्रशासनाची कार्यपद्धती वादाच्या भोव-यात सापडली आहे.
मुळा धरणाच्या लगत असलेल्या दरडगाव म्हैसगाव हद्दीतील मुळा नदीपात्रात आज शनिवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. नगरच्या गुन्हा अन्वेषण विभागाचे पथक पाहताच वाळु उपसा करणा-यांनी वाहने नदीपात्रात सोडुन पळुन जाण्याचा प्रयत्न केला.माञ पोलीस पथकाने पाठलाग करून वाळु उपसा करणा-यांच्या मुसक्या आवळल्या.
या कारवाईत 2 टेंम्पो, 3 ट्रॅक्टर, 4ब्रास वाळु हा 21 लाख 40 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक गोकुळ औताडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बाळासाहेब मुळीक,पोलीस कॉन्सटेबल मनोज गोसावी, दत्ता गव्हाणे,दिनेश मोरे, संभाजी कोतकर, अशोक गुंजाळ, सचिन अडबल, मयुर गायकवाड, सुहास बेरड या पोलीस पथकाने ही कारवाई केली. कारवाईने मुळा व प्रवरा नदीपात्रातील वाळु तस्करांचे धाबे दणाणले आहे.
दरडगाव म्हैसगाव हद्दीतील माती मिश्रीत वाळुचा नुकताच लिलाव झालेला आहे.माञ लिलाव झालेल्या ठिकाणची वाळु अद्याप उचलणे सुरू झालेले नाही.दरम्यान या भागातुन वाळुने भरलेली वाहने जात असल्याने वाळुचा उपसा नेमका कुठून होतो ? हा सवाल चर्चेचा बनला आहे.





























































