
मालवणमधील देवली खाडीपात्रातील प्राणघातक हल्ल्याच्या थरारक घटनेने मालवण तालुका शनिवारी हादरला. वाळू उपसा करणाऱ्या परप्रांतीय कामगारांवर हल्ला झाल्याची घटना शनिवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घडली. या हल्ल्यात सकलदीप मनबहाल सिंह (वय 48, रा. झारखंड) कामगाराचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी अन्य कामगार उसा सिंह याने दिलेल्या फिर्यादीनुसार तात्या उर्फ भिकाजी पवार (वय 38, रा. चिपी-कालवंड, ता. वेंगुर्ले) व राकेश रघुनाथ गावडे (वय 25, रा. डिकवल, ता. मालवण) यांच्याविरोधात मालवण पोलीस ठाण्यात प्राणघातक हल्ला करत ठार मारल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त तक्रारी नुसार पोलिसांनी दिलेली माहिती अशी – देवली येथील टेंडर धारक वाळू व्यावसायिक सुरेश नारायण नाईक यांचे बोटीवरील वाळू कामगार सकलदीप मनबहाल सिंह (वय ३८), यमुना मनबहाल सिंह (वय 53), पकलू लोभसिंह (वय 41), सकलदीप उसा सिंह (वय 26) हे चौघे भैया कामगार वाळूपट्ट्यात वाळू उपसा करत होते. त्यावेळी देवली किनाऱ्याहून छोट्या होडीच्या साहाय्याने तात्या पवार व राकेश गावडे हे दोघे वाळू उपसा होत असलेल्या होडीवर आले. ‘तुम्ही कोणाच्या सांगण्यावरून वाळू काढता? असा जाब विचारत शिवीगाळ करत लाकडी दांडा, कोयता आणि फावडे या साहित्याने कामगारांना मारहाण करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यात सकलदीप मनबहाल सिंह या कामगाराच्या मानेवर फावड्याचा जोराचा फटका बसताच तो खाडीपात्रात कोसळला. अन्य तीन कामगारांनी सकलदीपला पाण्याबाहेर काढले मात्र त्याची काहीच हालचाल होत नव्हती, असे फिर्यादीत म्हटले आहे.
सकलदीप याला खाडी किनारी आणल्यानंतर मालक सुरेश नाईक यांनी गाडीतून मालवण ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. सकलदीप हा मृत झाल्याचे तपासणी अंती डॉक्टरांनी स्पष्ट केले. सकलदीप याचा भाऊ यमुना मनबहाल सिंह हा कामगारही हल्ल्यात जखमी झाला.
हल्लेखोराना स्थानिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी मालवण पोलीस निरीक्षक सोनू ओटवणेकर अधिक तपास करत आहेत. या घटनेचा आढावा घेण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रोहिणी सोळंखे मालवणात दाखल झाल्या होत्या. रात्री उशिरा पर्यंत गुन्हा नोंद करण्याची कार्यवाही सुरू होती.


























































