
सांगली, कुपवाड आणि मिरज शहरात होणाऱया सार्वजनिक आणि घरगुती गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर सांगली महापालिकेने तयारी पूर्ण केली आहे. आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त संजीव ओव्होळ, उपायुक्त राहुल रोकडे आणि उपायुक्त चंद्रकांत आडके यांनी सर्व सुविधा सज्ज ठेवल्या आहेत.
गणेश विसर्जनासाठी मिरज येथे 5 ठिकाणी कुंड, 1 फिरते विसर्जन कुंड, कृष्णा घाट, गणेश तलाव येथे 6 निर्माल्य कलश, 50 कर्मचारी, 8 तराफा, निर्माल्य व दानमूर्ती वाहतुकीसाठी 16 वाहने, 2 बोट, स्व. नि., मुकादम, अग्निशमन जवान इत्यादी यंत्रणा तैनात ठेवण्यात आली आहे. विसर्जन संपल्यानंतर रस्ते सफाईसाठी 25 कर्मचारी नेमण्यात आले आहेत. यासाठी आरोग्याधिकारी डॉ. रवींद्र ताटे यांच्यासह वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर, अनिल पाटील आणि सर्व स्वच्छता निरीक्षक कार्यरत आहेत. याचबरोबर विसर्जन मार्गावर आणि विसर्जन ठिकाणी पुरेशी विद्युत
व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच, निर्माल्य वेळेत उचलण्याची सोयही करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेसाठी मनपाच्या रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या फायर फायटर तसेच बोटीसुद्धा गणेश तलाव आणि कृष्णा घाटावर तैनात करण्यात आल्या आहेत. विसर्जन ठिकाणी मूर्तिदान कक्षही उभारण्यात आला आहे. नागरिकांनी मूर्तिदानावर भर द्यावा, असे आवाहन आयुक्त सुनील पवार यांनी केले आहे

































































