सांगलीतील क्रीडा संकुलातील कोविड सेंटर पुन्हा सुरू होणार, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांची माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढू लागल्याने जिल्हा क्रीडा संकुल येथील डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर पुन्हा सुरू करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली आहे.

मिरज वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील कोरोना रुग्णांवर शनिवारपासून (दि. 17) जिल्हा क्रीडा संकुल येथील कोविड हेल्थ सेंटरमध्ये पुढील उपचार सुरू करण्यात यावेत तसेच सोमवारपासून (दि. 19) सर्वसामान्य कोविडबाधितांसाठीही उपचार सुरू करावेत, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी दिले आहेत.

जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी जिल्हा क्रीडा संकुल येथील डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरला भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल रोकडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुबोध उगाणे, निवासी वैद्यकीय अधिकारी तथा नोडल अधिकारी डॉ. प्रसाद पाटील उपस्थित होते.

डॉ. चौधरी म्हणाले, कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी आरोग्य कर्मचाऱयांनी अतिशय चांगले काम केले आहे. समाजाची गरज ओळखून आताही अधिक कार्यक्षमतेने सेवा म्हणून काम करावे. आपत्ती कायद्यांतर्गत आरोग्य कर्मचाऱयांच्या डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये काम करण्यासाठी नियुक्त आदेश काढले असून, त्यांना काम करणे बंधनकारक आहे. कोणीही परस्पर निर्णय घेऊ नये. काही अडचण असल्यास ती नोडल अधिकाऱयांना सांगावी. त्यांच्या अडचणीचे निराकरण केले जाईल, असे जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी सांगितले.

स्वतःच्या आरोग्यासाठी घराबाहेर पडू नका!

सांगली जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस प्रचंड मोठय़ा गतीने वाढत असून, ही बाब अत्यंत चिंताजनक आहे. बेड ऑक्सिजन व अन्य अनुषंगिक वैद्यकीय सुविधा या आजच्या घडीला पुरेशा असल्या तरी या सर्व यंत्रणांना मर्यादा आहेत. याची गंभीरता लक्षात घेऊन आता प्रत्येकानेच स्वतःलाच प्रश्न विचारण्याची गरज निर्माण झाली आहे. स्वतःचे आरोग्य ही स्वतःची देखील जबाबदारी आहे, याची जाणीव प्रत्येकाने ठेवणे गरजेचे आहे. विनाकारण घराबाहेर पडू नका, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी केले.

साडेतीन लाख नागरिकांना कोरोना लस

सांगली जिल्ह्यात आतापर्यंत 3 लाख 59 हजार 997 जणांना कोरोनाची लस देण्यात आली असून, यामध्ये 3 लाख 36 हजार 072 जणांना पहिला, तर 23 हजार 925 जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात दिवसाला सुमारे 20.800 मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवठा कोरोना उपचारासाठी करावा लागतो. जिल्ह्यात सध्या कोरोनाबाधितांची टक्केवारी वाढत असून, ही टक्केवारी दिनांक 5 ते 11 एप्रिल 2021 अखेर 13.38 पर्यंत पोहोचली आहे. जिल्ह्यात सध्या कोरोना उपचारासाठी 41 कोविड हॉस्पिटल्स उपलब्ध आहेत.

नियम पाळा, गर्दी टाळा; अन्यथा त्याही सेवा बंद करण्यात येतील

कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी मास्क, सॅनिटाझरचा वापर, सामाजिक अंतर या बाबींचे पालन तर कराच; पण प्रामुख्याने गर्दी टाळा. ज्या अत्यावश्यक सेवांना, बाबींना शासनाने परवानगी दिली आहे, अशा ठिकाणीही कोविड प्रादुर्भाव रोखण्यासाठी देण्यात आलेल्या निर्बधांचे काटेकोर पालन न झाल्यास त्याही सेवा बंद केल्या जातील व दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी दिला आहे.