
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आर्थिक तोट्याला तोंड देत असतानाच उत्पन्न वाढविण्यासाठी विविध प्रयोग केले जात आहेत. असे असले तरी आठवडाभरावर येवून ठेपलेल्या गणेशोत्सवाला कोकणात दाखल होणाऱ्या चाकरमान्यांना संगमेश्वर , साखरपा आदि बसस्थानकातील संगणक संच दुरुस्तीला गेलेले असल्याने आरक्षण मिळू शकत नाहीए. त्यामुळे राज्य परिवहन मंडळाच्या बसनेच प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे .
संगमेश्वर हे मुंबई गोवा महामार्गावरील एक महत्वाचे आणि मध्यवर्ती बसस्थानक म्हणून ओळखले जाते. या बसस्थानकात बावनदी , माखजन , करजूवे , फुणगूस खाडीपट्टा , आरवली , कुचांबे , नायरी , वाशी आदि 25 गावातील प्रवासी जा ये करीत असतात. गेले 25 दिवस संगमेश्वर बसस्थानकातील संगणक संच नादुरुस्त झाल्याने आरक्षण सुविधा बंद आहे. राज्य परिवहन मंडळाचा कर्मचारी आरक्षण केंद्रात सेवेसाठी येवून बसतो मात्र संगणकीय आरक्षण देण्याची यंत्रणाच नसल्याने प्रवासी हताश होवून परत जात आहेत .
गेले 25 दिवस साखरपा आणि संगमेश्वर या दोन्ही बसस्थानकात ग्रामीण भागातून आरक्षण करण्यासाठी प्रवासी वर्ग येतो मात्र त्यांना आरक्षण देण्याची यंत्रणा दुरुस्तीला गेल्याने आरक्षण देता येत नाही असे उत्तर ऐकावे लागते . सध्याच्या संगणकाच्या युगात संगणकीय आरक्षण यंत्रणा दुरुस्त व्हायला जर महिनाभराचा कालावधी लागत असेल तर यासरखी दुसरी शोकांतिका नाही अशी प्रतिक्रिया प्रवासी नामदेव महाडिक यांनी सामना जवळ बोलतांना व्यक्त केली . गणेशोत्सव आठवडाभरावर आला असतांना परतीच्या आरक्षणासाठी असंख्य प्रवासी दररोज संगमेश्वर आणि साखरपा या आरक्षण केंद्रात येत आहेत , मात्र त्यांना यंत्रणा बिघडली असल्याने आरक्षण देता येत नाही हेच उत्तर ऐकावे लागत आहे .
संगमेश्वर आणि साखरपा बसस्थानकात राज्य परिवहन बसचे आरक्षण मिळत नसल्याने प्रवासी नाईलाजाने खासगी बसचे आरक्षण करत असून संगमेश्वर बसस्थानकाबाहेर खासगी बस वाहतूकीचे अनेक एजंट असल्यामुळे राज्य परिवहन मंडळाचे प्रवासी देवरुख आगाराच्या दुर्लक्षामुळे खासगी वाहतूकीकडे वळत आहेत . राज्य परिवहन विभागाच्या रत्नागिरी विभाग नियंत्रकांनी या गैरसोयीची तातडीने दखल घ्यावी अशी मागणी संगमेश्वर आणि साखरपा प्रवासी संघटनेने केली आहे .



























































