
पोलीस कर्मचारी महिलेने राहत्या घरात दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील खोकराळे वस्ती येथे घडली आहे. या महिलेच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. लता गोरख खोकराळे (वय 29) असे मृत पोलीस महिलेचे नाव आहे.
लता खोकराळे यांची नियुक्ती शिर्डी पोलीस ठाण्यात होती. मात्र, सध्या त्या रजेवर होत्या. सध्या तळेगाव दिघे येथे माहेरी आई-वडिलांकडे राहत होती. दरम्यान, मंगळवारी सायंकाळी घरात कुणीही नव्हते. त्यावेळी त्यांनी पत्र्याच्या छताच्या लोखंडी अँगलला दोरीच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली.
आई-वडील गावातून सायंकाळी घरी आल्यावर हा प्रकार उघड झाला. त्यानंतर लता खोकराळे यांना तातडीने घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र, तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झालेला होता. याप्रकरणी गोरख बाबूराव खोकराळे (वय 65, रा. तळेगाव दिघे) यांनी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात खबर दिली. त्यानुसार ‘अकस्मात मृत्यू’ची नोंद करण्यात आली आहे.
संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक सुनील पाटील, तसेच शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.
























































