संगमनेर पालिकेच्या कचरा डेपोत जनावरांचे अवशेष, रायतेवाडी शिवारातील पाण्याचे स्रोत दूषित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संगमनेर नगरपालिकेच्या कचऱ्यातून प्राण्यांच्या मांसाचे तुकडे, जनावरांचे अवशेष टाकण्यात येत असल्याने रायतेवाडी शिवारातील शेतकऱ्यांचे नुकसान होत असून, त्या ठिकाणी दुर्गंधी पसरली आहे. ओढा आणि विहिरीचे पाणी दूषित झाले असल्याने रोगराई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यासंदर्भात नगरपालिकेला संबंधित नागरिक आणि शेतकरी तसेच ग्रामपंचायतीने तक्रार केलेली असूनदेखील अद्यापि कुठलीही कारवाई झालेली दिसत नाही.

संगमनेर शहरातील सर्व प्रकारच्या ओल्या-सुक्या कचऱ्यात जनावरांचे अवशेष टाकले जात असल्याने त्याठिकाणी अतिशय दुर्गंधी पसरलेली आहे. या सर्व बाबींची तक्रार संगमनेर नगरपरिषदेकडे करण्यात आलेली आहे. शिवारातील रहिवासी रवींद्र ढोमसे आणि साईराम ढोमसे यांच्या शेताच्या अगदी कडेलाच रायतेवाडी शिवारालगत हा कचरा टाकण्यात येतो; तसेच रायतेवाडी ओढ्यात व केटीवेअरमध्ये रात्रीच्या वेळी कचरा टाकला जात आहे. त्यामुळे ओढ्याचे पाणी दूषित झाले असून, रायतेवाडी गावात सर्वत्र दुर्गंधी पसरलेली आहे. गावात डासांचा उपद्रव वाढला आहे. पालिकेच्या या कचऱ्यामुळे आरोग्यविषयक समस्या निर्माण झाल्यास नगरपालिकेची जबाबदारी राहील, असे ग्रामपंचायतीने पालिकेला पत्र दिले आहे. सहा महिन्यांपूर्वी हे पत्र दिले असून, अद्याप त्यावर कुठलीही कार्यवाही झालेली नाही. लवकरात लवकर कार्यवाही झाली नाही, तर रास्ता रोको किंवा उपोषण असा आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी निवेदनाच्या प्रती दिल्या आहेत. निवेदनावर नरेंद्र शिंदे, सागर शिंदे, बाबूराव मंडलिक, चैतन्य मंडलिक, संतोष शिंदे, संजय मंडलिक, सतीश मंडलिक, गौरव मंडलिक आदींच्या सह्या आहेत.