
चैत्रबन नाल्याच्या निविदेतून मिळणाऱया टक्केवारीच्या वाटणीतून भाजपाच्या पदाधिकाऱयांमध्येच शुक्रवारी सांगली महापालिकेच्या आवारात स्थायी समितीचे सभापती धीरज सूर्यवंशी व भाजपचे शहर जिल्हा सचिव अतुल माने यांच्यात शोलेस्टाईल जोरदार हाणामारी झाली. पोलिसांनी वेळीच धाव घेत अतुल माने यांना पोलीस ठाण्यात आणले. दरम्यान, भाजपच्या दोन पदाधिकाऱयांनी महापालिकेत प्रचंड राडा केल्याचे वृत्त कळताच मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दोन्ही गटांना सबुरीने घेण्याचा सल्ला दिला. या घटनेचे वृत्त समजताच सूर्यवंशी व माने समर्थकांनी पोलीस ठाण्यासमोर मोठी गर्दी केली होती. त्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
सांगली महापालिका प्रशासनाने चैत्रबन ते आरवाडे पार्क हा नाला बंदिस्त करण्यासाठी दहा कोटींची निविदा प्रसिद्ध केली आहे. यासाठी निविदा भरण्याचे काम सुरू आहे. अतुल माने यांच्याशी संबंधित एकाने निविदा भरली होती. या निविदेवरून सूर्यवंशी व माने यांच्यात शुक्रवारी दूरध्वनीवरून वाद सुरू होता. शुक्रवारी स्थायी समितीची सभा होती. सभेचे कामकाज संपल्यानंतर सूर्यवंशी बाहेर आले होते. त्यावेळीच अतुल मानेदेखील महापालिकेच्या आवारात आले. निविदा भरण्यावरून एकमेकांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. यातून महापालिकेच्या आवारातील पार्ंकग जागेत सूर्यवंशी व माने यांच्यात हाणामारी सुरू झाली.
काही नगरसेवकांसह उपस्थित कर्मचारी, नागरिकांनी भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. हाणामारी व गर्दी बघून हाकेच्या अंतरावर असलेल्या पोलीस ठाण्यातील कर्मचाऱयांनी महापालिकेच्या आवारात धाव घेतली. अतुल माने यांना पोलीस ठाण्यात आणले. या मारामारीचे वृत्त पसरताच सूर्यवंशी समर्थकांनी महापालिकेच्या मुख्यालयासमोर गर्दी केली. काही वेळातच माने समर्थकदेखील पोलीस ठाण्यासमोर जमा झाले. यामुळे काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. अखेर पोलिसांनी जमावाला पांगवले. तर, माने यांना पोलीस ठाण्यातच बसवून ठेवले. तासाभराच्या गोंधळानंतर तणाव मिटला.
दरम्यान, भाजपच्या दोन पदाधिकाऱयांत मारामारी झाल्याचे वृत्त पसरताच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी तातडीने दखल घेत सावरासावर सुरू केली. दोन्ही बाजूंनी पोलिसांत तक्रार दाखल होऊ नये, यासाठी फोनाफोनी करण्यात आली. भाजपच्या एका वरिष्ठ मंत्र्यानेही दोघांशी संपर्क साधला. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत या मारामारीची पोलिसांत नोंद झाली नव्हती.
दोन महिन्यांपासून धुमसत होता वाद
धीरज सूर्यवंशी व अतुल माने भाजपच्या युवा संघटनेचे पदाधिकारी आहेत. ते चांगले मित्रदेखील होते. मात्र, या दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावरून वाद रंगला होता. भाजपच्या पदाधिकाऱयांनादेखील याची कल्पना होती. मात्र, वरिष्ठ नेत्यांनी वादात मध्यस्थी केली नाही. त्यामुळे या दोघांमधील वाद वाढत गेला अन् शुक्रवारी याचे पर्यावसन हाणामारीत झाले.




























































