
सांगली जिह्यात ढगाळ वातावरणामुळे सध्या द्राक्षबागायतदार धास्तावले आहेत. पाऊस थांबला नसतानाही मोठय़ा धाडसाने छाटणी घेतलेल्या द्राक्षबागांना भुरी, दावण्या, करपा व थ्रीप्स (तुडतुडे) रोगांचा सामना करावा लागत आहे. यंदा पर्जन्यमान चांगले असल्याने द्राक्षकाडी उत्तम प्रकारे तयार झाली. परिणामी, बागांना मालाचे प्रमाणही समाधानकारक असल्याने औषधांचा खर्चही माफक करावा लागला. मागील वर्षी ‘निलोफर’ चक्रीवादळाचा तडाखा, तर या वर्षी तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ामुळे हवामानात बदल झाला. यंदाचा हंगाम सुरळीत पार पडणार, अशी आशा असताना, अचानक वातावरणात झालेला बदल व पाऊस द्राक्षबगायतदारांसाठी डोकेदुखी बनला आहे.
‘द्राक्षपंढरी’ म्हणून सांगली जिह्याची ओळख आहे. परदेशातील अनेकांना येथील सुमधुर टपोऱया द्राक्षांनी भुरळ पाडली आहे. द्राक्ष बाजारपेठेत कधी येणार, याकडे चातकाप्रमाणे डोळे लागलेले असतात. यंदा अत्यल्प पाऊस पडला, त्यामुळे भूजलपातळीत म्हणावी तितकी वाढ झालेली नाही. उपलब्ध पाणीसाठय़ावर जिकिरीने द्राक्षबागा जगविण्याचे काम बागायतदार करीत आहेत. दरवर्षीपेक्षा यंदा चांगले पोषक वातावरण असल्याने औषधफवारणीच्या खर्चावर मर्यादा आल्या होत्या. द्राक्षबागा विविध रोगांच्या आक्रमणापासून वाचणार, अशी आशा बाळगून असणाऱया शेतकऱयाला या वातावरणामुळे पुन्हा एकदा खिंडीत गाठले आहे. या वतावरणामुळे द्राक्षबागांवर भुरी, दावण्या, करपा व तुडतुडे रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. फुलोऱयातील फूलगळ होण्याची शक्यता आहे.
द्राक्षबागांच्या छाटण्या प्रामुख्याने सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यांत घेतल्या जातात. काही बागा फुलोऱयात, तर काहींचे मणी तयार झाले आहेत. पहिल्या टप्यातील डिपिंग पार पडले आहे. मात्र, अचानक ढगाळ वातावरणामुळे काही ठिकाणी थेट घडावरच भुरी व दावण्याने घाला घातला आहे. महागडय़ा औषधफवारण्या दिवसभर सुरू आहेत. ऐन फुलोऱयात पाऊस झालाच, तर फुलोरा झडण्याची शक्यता आहे. परिणामी, उत्पादनात घट होणार आहे. यंदा थंडीचे प्रमाण जास्त असल्याने द्राक्षमण्यांच्या फुगवणीमध्ये अडचणी येत आहेत.
जाचक अटींचा शेतकऱयांना फटका
द्राक्ष या पिकाची शासनाने बहुवार्षिक पिकांत गणना केली असल्याने वर्षात दोन-तीनदा जरी या बागा लहरी निसर्गाच्या कचाटय़ात सापडल्या, तर याची नुकसानभरपाई त्याच वर्षात गणली जाते. मिळणारी मदत तोकडी असते. मात्र, हे पीक वाचविण्यासाठी झालेला खर्च भरमसाट असतो. तो खर्चही उत्पन्नामधून भरून निघत नसल्याने द्राक्षशेती हा आतबट्टय़ाचा व्यवसाय असल्याची अनेकांची प्रतिक्रिया आहे. दरवर्षी नुकसान सोसावे लागत असल्याने यंदा द्राक्षशेतीक्षेत्रात वाढ झालेली नाही. उलट अनेकांनी या निसर्गाच्या लहरीपणामुळे द्राक्षबागांवर कुऱहाड चालविली आहे.





























































