शिवसैनिकांनी जे केलं ते वाचल्यानंतर तुम्हीही त्यांचे कौतुक कराल

4786

संकट कोणतेही असो शिवसैनिक मदतीला सर्वात पुढे असतात. कोरोनाच्या संकटातही अडलेल्यांना, गरजूंना राज्यभरात शिवसैनिक मदत करताना दिसत आहे. सांगली जिल्ह्यात शिवसैनिकांनी भुकेने व्याकूळ झालेल्या आणि अवघं दोन दिवसांचं पदरात बाळ असलेल्या मातेला मदत केली. ही महिला ओली बाळंतीण असतानाही नाईलाजास्तव 3 किलोमीटर चालत आली होती. अखेर भयंककर थकवा आल्याने आणि भुकेने व्याकूळ झालेली ही महिला अन्नासाठी आणि वाहनाच्या मदतीसाठी रस्त्याने येणाऱ्या-जाणाऱ्यांना विनंती करत होती.

मिरज इथल्या जिल्हा रुग्णालयामध्ये अवघ्या दोन दिवसांपूर्वी या महिलेची प्रसुती झाली होती. कोरोनाच्या उद्रेकामुळे आणि रुग्णालयात दाखल होणाऱ्या कोरोनाग्रस्तांमुळे त्रास होण्याची शक्यता लक्षात घेऊन या महिलेला सोडण्यात आले होते. संचारबंदी लागू करण्यात आल्याने आणि रस्त्याला फारशी वाहने नसल्याने ही महिला आपल्या दोन दिवसांच्या बाळाला घेऊन सुमारे तीन किलोमीटरचं अंतर भर उन्हात चालत मिरज मार्केट परिसरात आली होती. ही महिला एका झाडाच्या सावलीचा बसली होती. खायला अन्न नाही आणि वाहनाची सोय नाही अशा चिंतेत सापडलेल्या या महिलेला काय करावे सुचत नव्हते. या महिलेकडे कोणाचंही लक्ष नव्हतं. मात्र या झाडाशेजारून जाणाऱ्या समिधा फडतरे या महिलेने या ओल्या बाळंतिणीला पाहिलं. फडतरे यांनी महिलेची विचारपूस केली. महिलेची व्यथा ऐकून फडतरे यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या कानावर ही बाब घातली. शिवसेनेचे मिरज तालुका प्रमुख संजय काटे , शहरप्रमुख चंद्रकांत मैगुरे यांनी तातडीने या महिलेची भेट घेतली. शिवसैनिकांनी पहिले या महिलेला पोटभर जेवू घातले. तोवर शिवसैनिकांनी महापालिका उपायुक्त स्मृति पाटील यांना या घटनेची माहिती दिली. उपायुक्त घटनास्थळी तातडीने पोहोचल्या. एका सेवाभावी संस्थेच्या मदतीने शिवसैनिकांनी आणि उपायुक्त पाटील यांनी या महिलेला अँम्ब्युलन्स उपलब्ध करून दिली आणि तिला तिच्या गावी म्हणजेच खंडेराजुरी इथे पाठवण्याची व्यवस्था केली.

आपली प्रतिक्रिया द्या