
टेनिस ही माझ्या आयुष्यातील सर्वात प्रिय गोष्ट आहे. मात्र एका मुलाची आई झाल्यावर माझ्या आयुष्याची दिशाच बदलली आहे. त्यातच वाढते वय आणि शरीरावर झालेल्या तीन शस्त्रक्रियांनी शरीर पूर्वीसारखे टेनिस कोर्टवर साथ देईनासे झालेय. त्यामुळे यंदाचे वर्ष संपल्यावर टेनिस कोर्टला अलविदा करण्याचा आपला निर्णय नक्की झाला आहे, अशा शब्दांत हिंदुस्थानी टेनिसतारका सानिया मिर्झा हिने निवृत्तीचे स्पष्ट संकेत दिले.
एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सानिया म्हणाली, आता मी 35 वर्षांची झालेय. माझ्या मनात कित्येक दिवस निवृत्तीचे विचार सुरू होते. माझ्या गुडघ्यावर 2 तर मनगटावर 1 शस्त्रक्रिया झाली आहे. माझे करीअर आणि महत्त्वाकांक्षेसाठी मला माझ्या मुलाचे करीअर खराब करायचे नाही. म्हणूनच मातृत्वाच्या भावनेने माझ्या टेनिस कोर्टवर कायम राहण्याच्या इच्छेवर मात केली आहे, असेही सानियाने स्पष्ट केले.




























































