
वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयकावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या निवासस्थानाबाहेर आंदोलन करणारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माणसं होती. पैसे देऊन, सुपारी देऊन त्यांना पाठवण्यात आले होते. ही सर्व सुपारीबाज माणसं वर्षावर किंवा मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी असतात, असा गौप्यस्फोट शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी पुराव्यानिशी केला. सोमवारी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना संजय राऊत यांनी एकामागोमाग एक फोटो दाखवत मिंध्यांच्या षड्यंत्राचा बुरखा टराटरा फाडला.
मातोश्री बाहेर आंदोलन करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भाडोत्री, सुपारीबाज लोकं होते. सुपारीचे सगळे खेळ सध्या वर्षा बंगल्यावर, मंत्रालयाच्या सहाव्या माळ्यावर आणि ठाण्यातून चालत आहेत, असा आरोप राऊत यांनी केला.
ते पुढे म्हणाले की मातोश्रीच्या बाहेर वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयकाच्या निमित्ताने 10-20 लोकं आले आणि घोषणाबाजी करून गेले. अद्याप या कायद्यातील सुधारणांवर संसदेत चर्चा व्हायची आहे. हे विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे चर्चेसाठी गेलेले आहे. त्या समितीत सर्वपक्षीय लोकं असतात. त्यात चर्चा होईल, पण त्याआधीच मुंबईतील आणि महाराष्ट्रातील वातावरण खराब करण्यासाठी बेईमान मिंधे गटाच्या लोकांनी मातोश्रीवर काही मुस्लिम समाजाची लोकं पाठवली. यावेळी राऊत यांनी काही फोटोही दाखवली.
मातोश्रीबाहेर आंदोलन करणारा सलमान शेख, अफरात सिद्दीकी, इलियास शेख, अकरम शेख, झिशान चौधरी, इम्रान शेख, अकबर सय्यद यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार नरेश म्हस्के आणि मुख्यमंत्र्यांच्या पत्नीसोबतचे फोटो संजय राऊत यांनी माध्यमांसमोर आणले.
मिध्यांचे मुखवटे रोज फाडले जात आहेत. परवा ठाण्यात भगवा सप्ताह निमित्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावरती काळोखातून काही फेकण्याचा प्रयत्न केला. हे देखील यांचीच लोकं आहेत. यातील किती लोकं ठाण्यातील होते? सगळे बाहेरून आणलेले सुपारीबाज लोकं होते, असा आरोप करत सत्ताबदल झाल्यावर तेव्हा बघून घेऊन असा दमही राऊत यांनी दिला.
अहमदशहा अब्दाली महाराष्ट्रात मराठी माणसात भांडणं लावण्याचा प्रयत्न करतोय. जे पाणीपतावर झाले होते आणि त्याला हे सगळे सुपारीबाज बळी पडताहेत. बीडमधील घटनेशी शिवसेनेचा संबंध नाही हे आम्ही सांगितले होते. मग आव्हानं कसली देताय आम्हाला? आम्ही अधिकृतपणे सांगितले होते की शिवसेनेचा संबंध नाही. आव्हानं कोणाला देताय? बाळासाहेब ठाकरे यांच्या मुलाला, शिवसेनेला? आम्हाला महाराष्ट्रात, मराठी माणसात भांडणं लावायची नाहीत, आणि कुणी लावत असेल तर आम्हाला ते मान्य नाही. महाराष्ट्र एकसंघ राहिला पाहिजे. आम्हाला धमक्या देता, महाराष्ट्र लुटणाऱ्या, मराठी अस्मिता पायाखाली तुडवणाऱ्या अहमदशहा अब्दालीला आणि त्याच्या सुपारी गँगला धमकी, आव्हान देऊन दाखवा, असा घणाघातही राऊत यांनी केला.
View this post on Instagram





























































