उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नार्को टेस्ट करा म्हणजे खोके, घोटाळे, अँटेलियाचे षड्यंत्र, आमदारांची फोडाफोडी असे सर्वकाही बाहेर पडेल, असा जोरदार हल्ला शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी आज केला.
संजय राऊत यांनी आज नवी दिल्ली येथे पत्रकारांशी संवाद साधला. देशमुख यांची नार्को टेस्ट करा असे भाजप म्हणतेय असे पत्रकारांनी त्यांना विचारले असता, देशमुखांची नार्को टेस्टची तयारी आहे, पण फडणवीसांनीही दाखवावी. फडणवीसांची नार्को टेस्ट केल्यास अनिल देशमुख यांच्यावरील 100 कोटींच्या वसुलीचे आरोप, शिवसेना नेत्यांवरचे आरोप अशी सर्व प्रकरणे त्यांनी कशी निर्माण केली ते बाहेर येईल, असे राऊत म्हणाले.
महाविकास आघाडीचे नऊ-दहा लोक आपल्याला चक्रव्यूहात अडकवायला बघताहेत, पण चक्रव्यूह कसे भेदायचे मला माहीत आहे, अशा देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याची संजय राऊत यांनी या वेळी खिल्ली उडवली. ते म्हणाले की, फडणवीसांच्या वक्तव्यांकडे महाराष्ट्र गांभीर्याने पाहत नाही. अनिल देशमुखांच्या खुलाशावर उत्तर देण्यासाठी फडणवीसांना दहशतवादी कारवायांत अडकलेल्या तुरुंगातील गुन्हेगाराची मदत लागते. त्यावरून ते चक्रव्यूहात किती अडकले आहेत हे स्पष्ट आहे.
चांदीवाल अहवालात अत्यंत स्फोटक माहिती
अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांची चौकशी करणाऱया न्यायमूर्ती चांदीवाल यांनी 1400 पानांचा अहवाल सादर केला होता. त्या अहवालात अत्यंत स्फोटक माहिती आहे. परंतु अहवालातील माहिती बाहेर येण्यापूर्वीच पुढच्या दहा-बारा दिवसांत फडणवीस यांनी शिवसेनेचे आमदार फोडून महाविकास आघाडीचे सरकार पाडले, असा आरोप करतानाच चांदीवाल अहवाल आधी जाहीर करा, असे आव्हान संजय राऊत यांनी दिले.