आता थांबायचं नाय… संजय राऊत यांचं ट्विट; थेट पंतप्रधान, राष्ट्रपतींना केलं आवाहन

आता थांबायचं नाय… हा सत्य कथेवर आधारित मराठी चित्रपट नुकताच महाराष्ट्रातील सर्व चित्रपटगृहांमध्ये झळकला. या चित्रपटावर कौतुकाचा वर्षावर होत आहे. अभिनेता भरत जाधव, सिद्धार्थ जाधव यांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनाही भुरळ पडली असून त्यांनीही या चित्रपटाचे कौतुक केले आहे. आता हा चित्रपट पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही पहायला हवा, तर त्यांना खरा देश कळेल, असे संजय राऊत म्हणाले.

सोमवारी सकाळी ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी या चित्रपटाबाबत केलेल्या ट्विटला रिट्विट करत संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. “आता थांबायचं नाय हा मराठी चित्रपट नक्की पहा. सध्या मराठी सिनेमा खरंच एका वेगळ्याच उंचीवर पोहोचला आहे. मराठी अस्मिता म्हणजे इतर भाषिकांवर राग काढणे नव्हे, तर आपली संस्कृती, भाषा, आणि कला अभिमानाने जगासमोर मांडणे”, असे ट्विट राजदीप सरदेसाई यांनी केले. याला संजय राऊत यांनी उत्तर दिले.

“होय, राजदीप, ‘आता थांबायचं नाय हा जबरदस्त मराठी चित्रपट मी पहिला! कथा, दिग्दर्शन आणि कलावंतांनी हा चित्रपट एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला आहे! सफाई कामगारांच्या जीवनावर इतके ज्वलंत भाष्य मी अनुभवले नव्हते. हा चित्रपट आमिर खान वगैरेंनी केला असता तर सरकारपासून देशभरातील समीक्षकांनी वेगळा विषय म्हणून डोक्यावर घेतला असता. राष्ट्रीय पुरस्कार आणि ऑस्कर पुरस्कार पर्यंत ढकलला असता! हा चित्रपट पंतप्रधान आणि राष्ट्रपतींनी पाहायलाच हवा, त्यांना खरा देश कळेल!”, असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे.