सीमा उघड्या पडल्या तरी चालतील. पण आमचा जल्लोष महत्त्वाचा!! संजय राऊत यांची संतप्त प्रतिक्रिया

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चिनी लाल माकडांनी गेल्या आठवड्यात तवांग सेक्टरमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. यावरून सध्या देशात प्रचंड संतापाचं वातावरण आहे. शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी या घटनेवर केंद्र सरकारला फटकारले आहे. केंद्र सरकार गुजरात निवडणूकीच्या जल्लोषात मश्गुल असताना देशाच्या सीमा भागात चीन घुसखोरी करतोय. सरकारने देशाच्या सुरक्षाव्यवस्थेचंही राजकारण केलं आहे, अशा शब्दात संजय राऊत यांनी केंद्र सरकारला फटकारले आहे.

”गुजरात निवडणूक होईपर्यंत चीन शांत होता. की त्यांना शांत राहायला सांगितलं होतं? लडाख झालं, डोकलाम झालं आता तवांग. लडाखमधून बाहेर काढलं तर ते आता तवांगमध्ये घुसले. त्यामुळे आता केंद्र सरकारमधील नेत्यांनी विरोधी पक्ष, विधानसभा निवडणूका, तपास यंत्रणा यांच्यामधून लक्ष काढून देशाच्या सीमेवर लक्ष केंद्रीत करावं. देशाच्या सीमा असुरक्षित झाल्या आहेत. चीनसारखा शत्रू तीनही बाजूने देशात घुसतोय त्यावर लक्ष दिलं तर खऱ्या अर्थाने राष्ट्राची सेवा होईल. विरोधी पक्ष आज संसदेच्या दोन्ही सभागृहात हा विषय लावून धरणार आहे. परिस्थिती गंभीर आहे. सरकार राजकारणात गुंतल्यामुळे देशाच्या सीमेवर दुश्मन धडका मारतायत आणि सरकार ही गोष्ट गांभिर्याने गेत नाहीए. प्रधानमंत्री, संरक्षण मंत्री देशापासून काहीतरी लपवतायत हे आता स्पष्ट होतंय. गेल्या शुक्रवारी तवांगमध्ये हे प्रकरण घडलं. आठवडा होत आला या गोष्टीला. आपले जखमी सैनिक गुवाहटीमध्ये उपचार घेतायत. नक्की सत्य काय आहे ते कळायला मार्ग नाही. आमचे किती सैनिक जखमी झाले आहेत. फक्त जखमी झाले की शहीद ही झालेत याबाबतचे काहीच सत्य सरकार सांगत नाही. जे गलवानमध्ये झाले तेच तवांगमध्ये झालंय. सरकार गुजरात निवडणूकीच्या जल्लोषात असताना. त्यांचा उत्सव सुरू असताना चीनचं सैन्य देशात घुसत होतं. त्यांनी देशाच्या सुरक्षा व्यवस्थेचेही यांनी राजकारण केलंय, उत्सव केलाय. सगळ्यांनी आमच्या जल्लोषात सामील व्हा. दुश्मन घरात घुसला तरी चालेल. सीमा उघड्या पडल्या तरी चालतील. पण आमचा जल्लोष महत्त्वाचा. राजकारण कोणत्या थराला गेलंय ते जर पाहिलं तर कालची घटना ही देशाच्या दृष्टीने दुर्दैवाची आहे”

”अरुणाचलमध्ये चीनी सैन्य पहिल्यांदा घुसलेलं नाही. त्यांनी कायम अरुणाचलवर आपला दावा सांगितला आहे. हे काय आपल्या सरकारला माहित नाही का? 1961ला चीनी सैन्य तवांगच्या पुढे आलं होतं. त्यावेळी तेथील स्थानिक लोकांनी सैन्यासोबत चीनी सैन्याशी लढून तवांग हिंदुस्थानच्या नकाशावर ठेवला होता. त्यामुळे हिंदुस्थानी संरक्षण दलाने, सरकारने अधिक सावधानतेने काम करणं गरजेचं होतं. पण ते झालेले नाही. चीनच्या कुरापती थांबत नाही. मजबूत सरकार, दुश्मनांचं थरकाप उडवणारं सरकार असं जे म्हटलं जातं. हे सरकार गिलगिट हिंदुस्थानात आणायचं बोलत होते पण त्याआधी तवांगच्या सुरक्षेबद्दल बोला. वारंवार चीनसारखा शत्रू देशामध्ये घुसतोय. आपण फक्त पाकिस्तानबद्दल बोलदतोय. चीन आपला खरा शत्रू आहे. चीनची आर्थिक ताकद आपणच वाढवतोय. अनेक बाबतीत तो आपल्या पुढे जातोय. आंतरराष्ट्रीय धोरण चुकतंय हे प्रमुख नेते सांगत आहेत. त्याच्यावर कुणीही चर्चा करत नाही. तवांगमध्ये चीनी सैनिक घुसले असतील तर ते देशासाठी दुर्दैवी ओआहे. याविरोधात विरोधी पक्षातील नेते काही बोलले तर आम्हाला देशद्रोही ठरवले जाते. आमच्यावर खोटे खटले दाखल होतात. आम्हाला तुरुंगात टाकले जाते”, असे संजय राऊत म्हणाले.

राज्यपालांचे राजकीय बॉसला पत्र लिहलं

रात्रीचा शपथविधी झाला तेव्हा राज्यपाल व केंद्रीय गृहमंत्रालयचा जास्त संपर्क होता. राज्यपालांचे राजकीय बॉस हे गृहमंत्री आहेत. त्यामुळे त्यांनी घटनात्मक बॉसला पत्र लिहण्यापेक्षा राजकीय बॉसला पत्र लिहलं आहे. पुण्यातील कडकडीत बंदची दखल केंद्र राज्य सरकारला व राज्यपालांना घ्यायला लागणार. हे बंदचं लोण पसरलं तर संपूर्ण महाराष्ट्र बंद होईल. 17 तारखेला महाविकास आघाडीचा जो मोर्चा आहे त्याची दखल त्यांना घ्यावीच लागेल.

… हा महाराष्ट्राचा अपमान
गुजरातच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला महाराष्ट्र व कर्नाटक दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. त्यावेळी दोघांमध्ये सीमावादावर चर्चा झाल्याची चर्चा सध्या सुरू आहे. त्यावरून संजय राऊत यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना फटकारले आहे. ”सीमा प्रश्न अत्यंत गंभीर प्रश्न आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे. अशा गंभीर प्रश्नावर जाता येता बोलणं म्हणजे काय हा इतका चीप, इतक्या खालच्या दर्जाचा प्रश्न आहे का? सीमा प्रश्न इतका खालच्या दर्जाचा आहे की कुठेही त्याची चर्चा करताय. कर्नाटकचे मुख्यमंत्री सतत महाराष्ट्रावर सातत्याने शाब्दिक हल्ले करताय, बदनामी करतायत, धमक्यचा देतायत, सीमाभागावर दावा करतायत. अशा विषयावर तुम्ही चालता चालता चर्चा करतायत हे किती गंभीर आहे. ज्या प्रश्नावर लोकं 55 वर्ष लढा देतायत तो प्रश्न दोन मिनिटांत बोलता. हा महाराष्ट्राचा अपमान आहे”, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.