
अजित पवार यांच्या विमान अपघातातील मृत्यूवरून महाराष्ट्रात संशयाचे वातावरण आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या विमान अपघाताची टाईमलाईन पत्रकारांसमोर मांडत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. इस्रायलची मोसाद हेर संस्था ज्या पद्धतीने आपल्या शत्रूंना संपवण्यासाठी हातखंडे वापरते तशा पद्धतीने अजितदादांचा घातपात केला गेला असा जाहीर आरोप रोहित पवार यांनी केल्याने एकच खळबळ उडाली आहे. यावर आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवारांसोबत घडलेली घटना प्रथमदर्शनी अपघात वाटत असली, तरी 24 तासांतील घडामोडींमुळे संशयाला जागा असल्याचे संजय राऊत बुधवारी दिल्लीत माध्यमांशी बोलताना म्हणाले.
संजय राऊत म्हणाले की, रोहित पवार यांचे संपूर्ण सादरीकरण पाहिले. हा विषय मी स्वत: संसदेत उचललेला आहे. अजित पवार यांच्यांसोबत घडलेली घटना ही प्रथमदर्शनी अपघात वाटत असली तरी अपघाताच्या आधी आणि नंतर 24 तासात ज्या घडामोडी घडल्या ते पाहता संशयाला जागा आहे. काही मुद्दे मी संसदेत उपस्थित केले होते. रोहित पवारांनी त्याही पुढे जाऊन अनेक तांत्रिक मुद्द्यांचा व्यवस्थित अभ्यास करून जे सादरीकरण केले ते धक्कादायक आहे.
रोहित पवार यांनी जे मुद्दे मांडलेले आहेत त्याचा महाराष्ट्राने विचार केला पाहिजे. अजित पवार यांचा दुर्दैवी मृत्यू हा महाराष्ट्रावर झालेला आघात आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचा समतोल त्यामुळे बिघडला. त्याच्यामागे काही सुनियोजित कट आहे का किंवा आहेच हे पवारांच्या कुटुंबातील एक प्रमुख व्यक्ती जी विधिमंडळात आहे, त्याने पुराव्यासह दाखवून दिले, असे राऊत म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणताहेत की, अजित पवार माझे मित्र होते, त्यांच्या मृत्युचे राजकारण करू नका. पण हे राजकारण नाहीच, हा संशय आहे. तुम्ही यात पुढाकार घेऊन रोहित पवार जे सांगताहेत त्या सगळ्या मुद्द्यांची तटस्थपणे चौकशी करायला पाहिजे. आदल्या दिवशी एक विमान सुरतला जाते, तेच विमान अजित पवारांना घेऊन बारामतीकडे येते आणि कोसळते. हे रहस्यमय आहे, असेही राऊत यावेळी म्हणाले.
विमान अपघात संशयास्पद; रोहित पवार यांचा बॉम्ब, अजितदादांचा ‘मोसाद’ पद्धतीने घातपात
रोहित पवारांनी पूर्व विदर्भातील नेत्याचा उल्लेख उल्लेख केला. तो नेता कोण? तो नेता भाजपचा आहे की राष्ट्रवादीचा? हे सांगायला काहीच हरकत नाही. जर ते नेते अजित पवारांना मुद्दाम उशिराने भेटले असतील आणि त्यांचा मोटारीने जायचा प्लॅन रद्द करायला लावला असेल तर त्या नेत्याची चौकशी व्हायला पाहिजे, अशी मागणीही संजय राऊत यांनी केली. त्यांच्याकडे अशी कोणती फाईल होती ज्यावर सही केली नसती तर महाराष्ट्र थांबला असता? की अजित पवारांकडे भाजपच्या भ्रष्टाचाराची जी फाईल होती त्याचा ताबा घेण्यासाठी तिथे येऊन तो नेता थांबला होता? असा सवाल करत ही गंभीर गोष्ट असल्याचेही ते म्हणाले.


























































