भीमा पाटस स्थिरस्थावर झाल्याशिवाय ही लढाई संपणार नाही; संजय राऊत यांचा निर्धार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी दौंड, येथे सभा घेतली. या सभेत त्यांनी भीमा पाटस कारखान्यातील भ्रष्टाचाराची पोलखोल केली. तसेच हा कारखाना येथील जनतेच्या, शेतकऱ्यांच्या म्हणजेच खऱ्या मालकांच्या हातात दिल्याशिवाय, तसेच कारखाना स्थिरस्थावर झाल्याशिवाय ही लढाई थांबणार नाही, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

संजय राऊत भाषणासाठी उभे राहताच शिट्ट्या वाजवत त्यांचे स्वागत करण्यात आले, त्यावेळी ते म्हणाले, शिट्ट्या वाजवू नका, 144 लागू आहे. 144 मध्ये शिट्ट्या वाजवण्यासाठीही बंदी असते, असा टोलाही त्यांनी लगावला. येथील जनता हीच कारखान्याची खरी मालक आहे.आपणच खरे बाप आहोत कारखान्याचे. कोणी स्वतःला कारखान्याचा बाप मानत असेल, तर ते खोटे बाप आहेत. धंगकेर यांचा पराभव करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सोडून भाजपचे सर्व नेते कसब्यात आले होते. मोदी फक्त भ्रष्टाचाऱ्याचा प्रचार करण्यासाठी जातात. जो भ्रष्टाचार करत नाही, त्याला भाजपमध्ये स्थान नाही. भ्रष्टाचारही लहान नाही. त्यांचे आकडे कोटींच्यावर आसतात. कोटींमध्ये भ्रष्टाचार. खोके, पन्नास खोके, शंभर खोके एकदम ओके, असे सध्या चालले आहे, अशी सणसणीत टीकाही त्यांनी केली.

येथील भ्रष्टाचाराची पोलखोल झाली आहे. आपल्याला तुरुंगात टाकले होते. भेटणार कसे, आपल्याला कशासाठी आत टाकले, काहीही केले नव्हते. आपल्या भावाकडून 50 लाख रुपये घरासाठी घेतले होते. ते परत केले. ईडीवाले आले आणि आपल्याला घेऊन गेले. आपणही त्यांच्यासोबत गेलो. आपण त्यांच्या हातापाया पडलो नाही. आपल्याला बाहेर येण्यापासून तुरुंगाच्या भिंती अडवू शकल्या नाही. तर कलम 144 काय अडवणार. साखर कारखान्यासाठी 144 कलम कशासाठी. येथे काय दंगल आहे. आम्ही सांगून दंगल करतो. लपूनछपून करत नाही. आम्हाला कारखान्यात जाण्यापासून अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आम्ही आतमध्ये गेलो. संस्थापकांना हार घातला आणि परत आलो. येथील जनता कारखान्याची खरी मालक आहेत. आम्हाला का रोखता. कारखाना तुमच्या बापाचा नाही. खरी मालक असलेल्या जनतेने आपल्याला अडवले काय, असा सवालही त्यांनी केला.

राहुल कूलशी आपले काहीही वैयक्तीक भांडण नाही. येथील कोणाशीही वैयक्तीक भांडण असण्याचे कारण नाही. जनतेने त्यांनापद, प्रतिष्ठा दिली, ताकद दिली. तुम्ही या संधीचे सोने करायला हवे होते. तुम्ही काय केले, कारखान्याची माती केली. 50 हजार शेतकरी सभासदांवर अन्याय, अत्याचार केला. त्या सभासदांनी उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहावे, अशी मागणी होत आहे. ते काय करणार, ते यांचे बाप आहेत, ते भ्रष्टाचाराचे बाप आहेत. हे राज्य कसले आहे, बेकायदा, बोगस राज्य आहे. दोन महिन्यांपासून मी भेटीसाठी त्यांचा वेळ मागतोय. माझे वैयक्तीक काम नाही. भीमा पाटस कारखाना भंगारात जात आहे. शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. तुमचे लाडके चेअरमन राहुल कूल यांनी प्रचंड भ्रष्टाचार, गैरव्यवहार केला आहे. अनेक लहानलहान गोष्टीत त्यांनी पैसे खाल्ले आहेत. पैसे सन्मानाने खायचे असतात, तेही त्यांना जमत नाही. मी राज्यातील जनतेच्या प्रश्नासाठी वेळ मागतोय. मात्र, ते पळ काढत आहेत. मी वेळ मागितली की ते पळ काढतात, असेही राऊत म्हणाले.

आता मी सीबीआयकडे तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर ईडीकडे करणार. त्यानंतर उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय आहेत. तसेच 2024 मध्ये आपले सरकार येणारच आहे. केंद्रात आणि महाराष्ट्रतही येणार, तेव्हा तुम्हाला कोण वाचतोय तेच बघतो. आम्हाला तुरुंगात टाकतात काय, तुम्हाला हे 500 कोटी पचू देणार नाही. हे मनी लाँडरिंग आहे. पैसे आले कुठून, गेले कुठे, परदेशात गेले, काळ्याचे पांढरे केले. असे असतानाही सरकार विरोधी पक्षातील नेत्यांवर खोटे गुन्हे दाखल करत आहे. या भ्रष्टाचाराकडे त्यांचे लक्ष नाही.

शिवसेनेतून गेलेले 40 पैकी 12 जण भ्रष्टाचाराने बरबरबटलेले आहेत. त्यांच्यावर केस आहेत. त्यांना भाजपमध्ये घेतले. वॉशिंग मशीनमध्ये टाकले आणि स्वच्छ केले. आता त्यांचे काय झाले किरीट सोमय्या. पुढील वेळी त्यांना बरोबर आणीन. नाही आले तर त्यांना खेचत आणीन. हा बघा 500 कोटींचा भ्रष्टाचार सोमय्या. मिस्टर कूल तुम्ही कूल आहात तर मी हॉट आहे. हा साखर कारखाना जनतेचा, शेतकऱ्यांचा आहे. त्यावेळच्या 500 रुपयांच्या शेअरची किमत काय आहे. पोटाला चिमटा काढून आपल्या पूर्वजांनी कारखाना उभारला. त्यांनी कारखान्याची माती केली. कर्नाटकातील इराणीबाबाला कारखाना चालवायला दिला. द्यायचा आहे तर महाराष्ट्रात द्या. महाराष्ट्रात कोणी नाही काय. मुळात कारखाना कोणाला देण्याची गरजच नाही. कर्नाटकासोबत आपला सीमावाद आहे. आपले बेळगाव घेतले आहे. आता कारखाना घेणार का. त्यांना कारखाना चालवता येत नसलेतर येथील जनतेला द्या, ती जनता चालवून दाखवेल. येथील सर्व कारखाने चांगले चालले आहे. मग हाच कारखाना डबघाई का, त्यांनी खा खा खाल्ले आता खाता येत नाही. म्हणून चालवायला देत आहात काय, असा सवालही केला.

144 कलमाची भीती दाखवूनही ही सभा तुडूंब झाली आहे. ही त्या भ्रष्टाचारी चेअरमनच्या कानाखाली लगावलेली चपराक आहे. आपण या विरोधात आवाज उठवला आहे. माझा आवाज कोणीही दाबू शकत नाही. भ्रष्टाचार म्हणजे आजचे सरकार. शिवसेनाप्रमुखांची शिवसेना चोरांच्या हातात दिली. बाळासाहेबांनी निवडणूक आयोगला विचारून पक्ष स्थापन केला नव्हता. तपास यंत्रणांचा धाक दाखवत इतर पक्ष फोडायचे आणि भाजपमध्ये घ्यायचे, भाजप हा भ्रष्टाचारी पक्ष आहे. हा कारखाना पुन्हा स्थिरस्थावर होईपर्यंत आपण तुमच्यातील एक म्हणून मी लढत राहणार आहे. 144 सोडा. 1 हजार 44 लावा. आम्हाला फरक पडत नाही. आम्ही लढणारच, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

160 केसे माझ्यावर आहेत. 161 झाली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा चेला आहे मी. या लोकांसारखे शरीर वाघाचे आणि काळीज उंदराचे नाही. आमचे काळीज वाघाचे आहे. एक हात मृत्यूच्या खांद्यावर ठेवत आम्ही फिरत असतो. आम्हाला सुरक्षेची गरज नाही. असेल हिंमत तर या समोर.144 असूनही घुसलो आम्ही कारखान्यात. तेथे जाऊन आलो. कारखाना तुमचा नाही, आमचा आहे. कारखाना चालवण्यासाठी 36 कोटी रुपये दिले होते. ते पण यांनी खाल्ले. या प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांच्यावर 420 खटला दाखल झाला पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना या बंद कारखान्याला चालवण्यासाठी 36 कोटी दिले होते. त्याचा हिशोब नाही. ही फसवणूक आहे. देवेंद्र फडणवीस तुम्ही कोणाला पाठिशी घालताय, तुम्ही कोणती गँग, टोळी चालवताय. ही टोळी महाराष्ट्राचे नुकसान करत आहे. ही टोळी कष्टकरी शेतकऱ्यांना संपवणारी आहे. या राज्यातील कारखान्यांचे, शेतकऱ्यांचे सहकाराचे नुकसान कोणी केले असेल, तर ते भाजपमध्ये असणाऱ्या 100 राहुल कूल यांनी केले आहे.

आपल्याला फक्त दौंडसाठी नाही. तर भ्रष्टाचारमुक्त, लूटमुक्त महाराष्ट्र करायचा आहे. त्यासाठी यज्ञ आपल्याला पेटवायचा आहे. या यज्ञात आपल्याला संहिता टाकायच्या आहेत. त्यासाठी आपण सर्व एकत्र आहोत. भीमा पाटस स्थिर स्थावर झाल्याशिवाय ही लढाई संपणार नाही. हा कारखाना चांगल्या हातात, त्यांच्या मलकांच्या हातात दिल्याशिवाय ही लढाई थांबणार नाही. 144 लावा, सरकार असेपर्यंत कितीही सुरक्षा ठेवा. पोलिसांनीही लक्षात ठेवावे, आज आम्हाला रोखताय, उद्या तुम्हीच आम्हाला सन्मानाने नेणार आहे. हे लक्षात ठेवत आमच्याशी वागा. जो संघर्ष करतो, तो लढतो, जो झुंजतो, तोच टिकतो. आपण आपल्या हक्कांसाठी लढत राहू, असेही संजय राऊत म्हणाले.