
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रावर अचानक हल्ला केला आहे. या हल्ल्यामागे फार मोठे कारस्थान आणि षडयंत्र असल्याचा गंभीर आरोप शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांविषयक अपमानजनक वक्तव्ये केली. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. याबाबत महाराष्ट्रात नाराजी वाढत असतानाच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमेलगतच्या काही भागांवर वक्रदृष्टी टाकली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा भाजप नेत्यांकडून झालेला अपमान आणि त्यानंतर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलेली विधाने ही योगायोग नसल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याबाबत बोलताना राऊत म्हणाले की, “महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाचा जो विषय सुरू आहे, त्यावरून लक्ष विचलित व्हावं , संताप कमी व्हावा यासाठी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना लिहून दिलेलं हे स्क्रिप्ट आहे.”
राऊत यांनी मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलताना म्हटले की, भाजप हा शिस्तबद्ध पक्ष आहे. भाजपच्या एका राज्याचा मुख्यमंत्री भाजपच्या दुसऱ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर अशा प्रकारे कधीच टीका करत नाही. त्यामुळे कर्नाटकच्या भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या भाजपच्या उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्र्यांविषयी अशा प्रकारे बोलणं हे ठरलेलं स्क्रिप्ट आहे. “महाराजांवर जी चिखलफेक केली आहे त्यामुळे महाराष्ट्रात सरकारविरोधात संतापाची लाट उसळली आहे. त्यापासून लक्ष विचलित व्हावं, महाराजांच्या अपमानाचा विषय मागे पडावा म्हणून बोम्मईना पुढे करून, महाराष्ट्रातल्या सीमेलगतच्या भागांवर हक्क सांगण्याचा हा प्रयत्न आहे. जेणेकरून लोकांनी दुसऱ्या विषयाकडे वळावं आणि महाराजांचा अपमान लोकांनी विसरावा.” असे राऊत यांनी म्हटले आहे.
राऊत म्हणाले की, राज्यपालांनी जेव्हा मुंबई-ठाण्यातील मराठी माणसाचा अपमान केला तेव्हा लक्ष विचलित करण्यासाठी संजय राऊत यांना अटक झाली. त्यांचे स्क्रिप्ट तयार असतं. आताही तसंच आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान लोकांनी विसरावा म्हणून सीमाभागाचा विषय वेगळ्या पद्धतीने काढून महाराष्ट्रावर हक्क सांगण्यात आला. तुम्ही कितीही कारस्थाने केली तरी महाराष्ट्राची जनता हे सहन करणार नाही. याविरोधात उद्धव ठाकरे यांनी रणशिंग फुंकले आहे. महाराष्ट्राच्या सगळ्यात मोठ्या लढाईसाठी आम्ही तयार आहोत, ही लढाई कोणत्याही थराला जाईल.” या खोके सरकारवर, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बोलण्यावर महाराष्ट्राचा विश्वास नाही. यांना खोके दिले की हे गप्प बसतील आणि महाराष्ट्राला विसरतील पण शिवसेना महाराष्ट्राला विसरणार नाही, असे राऊत यांनी ठणकावून सांगितले.






























































