मोदी परत येणार नाहीत, ही एकच गॅरंटी! संजय राऊत यांचा हल्लाबोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशातील शेतकरी, बेरोजगारांचे अनेक प्रश्न आहेत. त्यावर मोदी, शहा यांच्याकडून एकच उत्तर दिले जाते ते म्हणजे ‘रामलल्ला का दर्शन फ्री करायेंगे’; परंतु मोदी यांनी कितीही गॅरंटी दिली तरी, ‘मोदी मात्र परत येणार नाहीत, हीच आमची गॅरंटी आहे’, असा हल्लाबोल शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे तेव्हा वाजपेयी यांना म्हणाले होते की, मोदी गया तो गुजरात गया. शिवसेनाप्रमुखांमुळे मोदी आहेत. आज देशाची अशी स्थिती आहे की, ‘मोदी है तो देश गया’, अशा शब्दांत संजय राऊत यांनी समाचार घेतला.

मोदींनी निवडणूक आयोग, आमदार-खासदार खरेदी केले
मोदी यांनी ओएनजीसी विकलं, विमानतळ विकलं. देश विकला, असे आपण म्हणतो; परंतु काही गोष्टी मोदी यांनी खरेदी केल्या आहेत. त्यांनी कोर्ट खरेदी केलं, निवडणूक आयोग खरेदी केला. महाराष्ट्रातील आमदार-खासदार खरेदी केले. त्यावर ते आता देश चालवतात. त्यांचे राज्य आपल्याला उलथवून टाकायचे आहे, असे आवाहन संजय राऊत यांनी केले.

टोपी उड जायेगी अजितराव!
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना पाडणारच! या वक्तव्याचा खासदार संजय राऊत यांनी खास शैलीत समाचार घेतला. त्याला उपस्थितांनी जोरदार प्रतिसाद दिला. अजित पवार यांच्या या आव्हानावर संजय राऊत म्हणाले, आमच्या पाडापाडीच्या खेळात पडाल, तर पहिलं तुम्ही पडाल. नाव घेऊन बोलायचं असतं. तो दम आमच्यात आहे. ‘हवा बहुत तेज चल रही है, टोपी उड जायेगी अजितराव!’, असे सांगताच सभेत एकच जल्लोष झाला.