राष्ट्रपती राजवट लावण्याचे षड्यंत्र जनता उधळून लावेल, शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नवहिंदू ओवेसी आणि खरा ओवेसी यांच्या माध्यमातून महाराष्ट्रात दंगली घडवायच्या, त्यानंतर राजभवनातून कायदा आणि सुव्यवस्थेच्या नावाखाली केंद्राला अहवाल पाठवून राष्ट्रपती राजवट लावण्याचा प्रयत्न करायचा, अशा प्रकारचे षड्यंत्र सुरू असून महाराष्ट्राची जनता हे षड्यंत्र उधळून लावल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास शिवसेना नेते, उत्तर महाराष्ट्र विभागीय नेते, खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

जनता बंड करून उठेल

सामान्य माणसाने पाच रुपयांचा अपहार केला तरी त्याला कोठडी मिळते, त्याचं ऐकून घेतलं जात नाही, ताबडतोब सुनावणी होत नाही. मात्र, न्यायालयात विशेष मर्जीने अर्णब गोस्वामीपासून ते विक्रांत घोटाळ्यातील आरोपींना दिलासे दिले जातात. याविरुद्ध लोक बंड करून उठतील. आणीबाणीमध्ये हे असं होत होतं, तेव्हा लोकांनी आणीबाणी उधळून लावली. स्वर्गीय पंतप्रधान इंदिरा गांधींचाही त्यावेळी पराभव झाला होता. या देशाची जनता अत्यंत शहाणी आहे, हे मी नाशिकच्या पवित्र भूमीवरून सांगतोय. लोकांच्या हातात हनुमानाची गदा आहे, ते तुमच्या लंकेची राख करू शकतात, इतकी ताकद या जनतेमध्ये आहे, असेही ते म्हणाले.

आदित्य ठाकरे अयोध्येला जाणार

मे महिना महाराष्ट्र निर्मितीचा आहे. एक मे हा महाराष्ट्र दिन असतो. राज्यामध्ये रामराज्य आणण्याचा आमचा संकल्प आहे. पर्यटनमंत्री, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मे महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱया आठवडय़ात नाशिक शहर जिल्हा शिवसेनेच्या पुढाकाराने राज्यभरातील शिवसैनिक अयोध्येत जाणार आहेत. अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या चरणी जाऊन आम्ही प्रार्थना करणार आहोत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यापासून कोविड, चक्रीवादळ यांसारखी अनेक संकटे आली, त्यातूनही आपण आता उभे राहतोय. पुढचा काळही चांगला जावो अशी ही रामराज्याची संकल्पना आहे, असेही ते म्हणाले.

माझा आवाज अजिबात बंद होणार नाही

अनिल देशमुख आणि नवाब मलीक प्रकरणामध्येसुद्धा खोटेपणाने कागद बनवलेले आहेत, यावर पुढे ते म्हणाले की, मीही त्याचा एक बळी आहे, माझ्याबाबतीमध्ये संपूर्ण प्रकरण खोटेपणाने बनवले आहे. फक्त संजय राऊत हे महाविकास आघाडीचे प्रोटेक्टर असून, सतत बोलत असतात, भाजपावर बोलतात, त्यांच्या खोटेपणावर बोलतात, त्यांच्या ढोंगावर प्रहार करतात, त्याच्यामुळे माझा आवाज बंद करण्याचा प्रयत्न होतोय. पण, माझा आवाज सहज बंद होणार नाही.