संस्कृत प्रवाह: भूमी सूक्तातील राष्ट्रऐक्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>डॉ. प्राची मोघे

अथर्व वेदाच्या बाराव्या कांडात 63 मंत्रांचे अथर्व ऋषींनी रचलेले भूमी सूक्त आहे. यात पृथ्वी ही संपूर्ण चराचराची माता आहे असे म्हटले आहे. चेतनेचे, पर्यावरणीय ऐक्याचे यात सुंदर वर्णन आहे. या विश्वातील पृथ्वी ही वसण्यासाठी सर्वात सुंदर जागा आहे. या वसुंधरेचे वर्णन काय करावे? ही भूमी सुजलाम, सुफलाम सस्य श्यामलाम आहे. हे केवळ भारत भूचेच वर्णन आहे असे नव्हे, तर साऱया भूमीचे आहे.
आजच्या जागतिकीकरणाच्या युगात आपण सारे जग हे एक खेडे आहे किंवा एक घरटं आहे असे मानतो. पण ही कल्पना वैदिक काळापासून आहे. वेदात विश्वं एपं नीडं म्हणजे सारी दुनिया हे एक घरटं आहे असे म्हटले आहे. ऋग्वेदात वैश्विक ऐक्याची, विश्वबंधुत्वाची आणि विश्वकल्याणाची कामना ‘वसुधैव कुटुंब’ किंवा ‘सर्वेपि सुखिनः सन्तु’ या मंत्रातून दिसते.

मानवच नाही तर सारे सजीव, निर्जीव गोष्टी या सृष्टीचा भाग आहेत आणि जे एक ऋत म्हणजे वैश्विक नियम आहेत त्याच्याशी बांधल्या गेल्या आहेत. हीच कल्पना नंतर एपं सत यात विकसित झाली. सारे जग त्या सतशी म्हणजेच वैश्विक सत्य, जगन्नियंता किंवा ब्रह्म याच्याशी जोडलेले आहे. हीच संकल्पना पुढे उपनिषदांमध्ये अद्वैत दर्शन म्हणून दिसून येते. या तत्त्वज्ञानाचा दैनंदिन जीवनाशी काय संबंध किंवा विश्वशांतीशी काय संबंध? खरे तर तत्त्वज्ञान/दर्शन याचे मूर्त रूप हे जीवन व्यवस्थेत, व्यावहारिक जगात असते. वैदिक वाङ्मयात ऋषींनी केलेल्या प्रार्थना या ऐहिक सुख, समृद्धी, संपत्ती मिळावी यासाठी आहेतच. आयुष्य म्हणजे फक्त भौतिक सुख मिळवणे नव्हे, तर खऱया अर्थाने आयुष्य उपभोगणे म्हणजे आरोग्य, आनंद,सुख आणि शांती मिळवणे. यातूनच धर्म, अर्थ, काम याची परिपूर्ती झाली की मोक्ष मिळतो असे मानले आहे. मोक्ष म्हणजे त्या परम सत्याला जाणणे.

वैदिक ऋषी माणूस आणि चराचर सृष्टी यातील ऐक्य सांगतात आणि त्यातून शांती कशी मिळते ते मांडतात. आपली जीवनशैली ही निसर्गाशी मिळतीजुळती, तादात्म्य पावणारी असेल तर आपल्याला मनःशांती लाभते. समन्वय नसेल तर शांती मिळत नाही, अनेक मनोकायिक आजार जडतात. दुःख होते. जर मन, शरीर आणि आत्मा यात स्वास्थ्य असेल तर शांती मिळते.
अथर्ववेदात पुढील मंत्र सांगितला आहे…
इमानि यानि पंचेंद्रियाणि मनः षष्ठानि हृदि ब्रह्मणा संशितानि.
यैरेव ससृजे घोरं तैरेव शांतिरस्तु नः
पंच इंद्रिये म्हणजे डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा आणि सहावे मन. या सहा गोष्टी जर संयमित नसतील तर अस्वस्थता येते, शांती मिळत नाही. पण जर याच गोष्टी संयमित असल्या आपल्या शहाणीवेच्या नियंत्रणात असतील तर शरीर, मन शुद्ध होते आणि अंतर्बाह्य शांती लाभते.

अथर्व वेदाच्या बाराव्या कांडात 63 मंत्राचे अथर्व ऋषींनी रचलेले भूमी सूक्त आहे. यात पृथ्वी ही संपूर्ण चराचराची माता आहे असे म्हटले आहे. चेतनेचे, पर्यावरणीय ऐक्याचे यात सुंदर वर्णन आहे. या विश्वातील पृथ्वी ही वसण्यासाठी सर्वात सुंदर जागा आहे. या वसुंधरेचे वर्णन काय करावे? ही भूमी सुजलाम, सुफलाम सस्य श्यामलाम आहे. हे केवळ भारत भूचेच वर्णन आहे असे नव्हे, तर साऱया भूमीचे आहे. पृथ्वी ही माता आणि आम्ही सारे तिचे पुत्र आहोत, असा उद्घोष कवी अथर्व करत आहे. या भूमीचे रक्षण करणे, ही वसुंधरा सदैव हिरव्या निसर्गाने नटलेली, फळफुले देणारी, खाऊपिऊ घालणारी अशी चिरंतन राहू दे यासाठी प्रयत्न करणे हे आमचे कर्तव्य आहे.

खरे तर विश्वशांती म्हणजेच विश्वकल्याण. परस्पर साहचर्य, आपापसातील प्रेम, बंधुभाव, आदर, विश्वास यातूनच सगळ्यांचे कल्याण होते नि मग आपोआप शांती लाभते. शांतीपूर्ण जीवन जगण्यासाठी आपण सारे एक आहोत. एकदिलाने, बंधुतेने आणि सहकार्याने प्रेमाने जगत आहोत ही भावना किती छान आहे! ऋग्वेदातील दहाव्या मंडळातील 191 सूक्त म्हणजे वरील भावनेचे शब्दरूप.
संगच्छध्वं संवदध्वं
सं वो मनांसि जानताम्
देवा भागं यथा पूर्वे
सञ्जानाना उपासते।।
आपण एकत्र, समन्वयाने चालू, एका सुरात म्हणजे सुसंवादी बोलू, एकदिलाने राहू, ज्याप्रमाणे यज्ञात देव एकत्र त्यांचा हविर्भाग घेत असत त्याप्रमाणे आपण सारे एकत्र राहू.
समानो मत्रः समितिः समानी
समानं मनः सहचित्तमेषाम् लू
समानं मत्रमभिमत्रये वः
समानेन वो हविषा जुहोमि।।
आपले उद्दिष्ट एक असो, आपण एकमनाने राहू. आपल्या या ऐक्यासाठी मी समान प्रार्थना करतो.
समानी व आकूतिः
समाना हृदयानि वः।
समानमस्तु वो मनो यथा वः सुसहासति।।
आपले उद्दिष्ट एक असो, आपल्या मनोकामना एक असो.
या ऐक्यामुळे निर्भयता तयार होते. जगात शांतता आणि समृद्धी नांदायची असेल तर प्रेम, सहृदयता, आपुलकी, साहचर्य वगैरे ही वैश्विक मूल्ये रुजावी लागतात. जसे यामुळे समाजमन स्वस्थ राहते.
विश्वशांती आणि विश्वबंधुतेसाठी मैत्रीची दृष्टी तयार होणे गरजेचे असते. मैत्रीमुळे, सौहार्दामुळे अनेक प्रश्न सुटू शकतात. मैत्र भावनेमुळे परस्पर विश्वास, सुरक्षितता निर्माण होते. यासंदर्भात वैदिक ऋषी सांगतात –
द्रुत ह मा मित्रस्य मा चक्षुषा सर्वाणि भूतानि समीक्षनताम
मित्रस्याहं चक्षुषा सर्वाणि भूतानि समीक्षे मित्रस्य चक्षुषा समीक्षामहे

सर्व सजीव सृष्टीकडे मैत्रभावाने पाहावे, एकमेकांकडे मैत्रदृष्टीने बघावे.

आपण जर वैदिक मंत्रांचा नीट अभ्यास केला आणि त्यातील शाश्वत मूल्ये आचरणात आणली तर नक्कीच या जगात ऐक्य, बंधुत्व आणि शांती नांदेल आणि सर्वांचेच कल्याण होईल.

या लेखाचा शेवट यजुर्वेदाच्या शांतीमंत्राने करते, ज्यात सृष्टीचे सर्व तत्त्व आणि घटक यात शांती निर्माण होऊ दे अशी प्रार्थना केली आहे. पृथिवी शान्तिरापः शान्तिरोषधयः शान्तिः। सर्वं शान्तिः, शान्तिरेव शान्तिः सा मा शान्तिरेधि। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः।

(लेखिका पुरातत्वशास्त्राच्या प्राध्यापक आहेत)
– [email protected]