
सामना ऑनलाईन । मुंबई
अभिनेत्री सारा अली खान ही लवकरच ‘केदारनाथ’ या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. सध्या सारा तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. या सर्व धावपळीत साराला तिचे आजारपणही त्रास देत आहे. साराला पीसीओडी हा आजार असून त्यामुळे अनेकदा तिला भयंकर पोटदुखीचा त्रास देखील होतो. साराने एका टॉक शोमध्ये तिच्या या आजाराविषयी सांगितले आहे. पीसीओडी हा महिलांना होणारा आजार असून मासिक पाळीचे चक्र बिघडल्याने हा त्रास सुरू होतो.
चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी साराचे वजन १०० किलोच्या जवळपास होते. पदार्पणापूर्वी तिने प्रचंड मेहनत घेत जवळपास तीस ते चाळीस किलो वजन कमी केले आहे. मात्र हे वजन कमी करताना तिला झालेल्या त्रासाविषयी सांगताना साराने तिला असलेल्या पीसीओडीच्या त्रासाविषयी देखील सांगितले. ‘मला पीसीओडी म्हणजेच पॉलिस्टिक ओव्हरी डिसीजचा त्रास आहे. त्यामुळे वजन कमी करणे हे माझ्यासाठी एक आव्हान होते. पीसीओडीचा त्रास असलेल्यांचे वजन सहज कमी होत नाही’, असे साराने सांगितले.
































































