
सामना ऑनलाईन, मुंबई
सारस्वत बँकेच्या ग्राहकांसाठी खूशखबर आहे बँकेने नुकतीच ग्राहकांसाठी व्हॉटसअॅप बँकिंग सेवा सुरू केली आहे. अशा प्रकारची सेवा देणारे सारस्वत बँक देशातली दुसरी आणि सहकारातील पहिली बँक ठरली आहे.
व्हॉटसअॅप बँकिंगमुळे सारस्वत बँकेच्या ग्राहकांना SMS ऐवजी Whatsapp नोटिफिकेशन मिळू शकतील. ग्राहक येथे संवादही साधू शकतील. शिवाय खात्यातील शिल्लक तपासणे, मिनी स्टेटमेंट मिळवणे इत्यादी गोष्टी याद्वारे साध्य होतील. मोबाईल बँकिंग नोंदणी बँकेच्या इतर उत्पादनांची माहिती विनंती आणि चौकशी अर्ज तसेच ॲप डाऊनलोड करणे इत्यादी गोष्टी टप्प्याटप्प्याने उपलब्ध होणार आहेत. बँकेच्या उत्पादनाच्या माहितीसंदर्भातील सखोल चौकशी, व्याजदर,अर्ज डाऊनलोड करणे इत्यादी गोष्टी करीत एका क्लिकद्वारे येथून थेट जाण्याची सुविधा देखील बँकेच्या वेबसाईटवर उपलब्ध असेल. 9029059271 या क्रमांकावर मिस कॉल देऊन ग्राहक ‘व्हॉटसअॅप बँकिंग सेवा’ यासाठी नोंदणी करू शकतात.
झपाट्याने बदलत असलेल्या ग्राहकांशी थेट संवाद साधणं खूप गरजेचे झाले आहे. कमी वेळात ग्राहकांपर्यंत पोचण्यासाठी स्मार्ट संदेशवहनाची मदत होते. डिजिटल व्यासपीठाच्या माध्यमातून नवीन, औत्सुक्यपूर्ण आणि वापरण्यास सोपी अशी सेवा देऊन डिजिटल क्षमता उंचावण्याचा सारस्वत बँकेच्या सतत प्रयत्न सुरू आहे


























































