
सातारा जिल्ह्यात कोरोनानंतर आता डेंग्यू व चिकुनगुणियाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. वातावरणातील बदलांमुळे अनेकजण तापाने फणफणले आहेत. जिह्यात गेल्या काही दिवसांत डेंग्यूचे व चिकुनगुणियाचे रुग्ण वाढले आहेत. डेंग्यूचे 318, तर चिकुनगुणियाचे 38 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आरोग्य आणि हिवताप विभाग अलर्ट झाला आहे.
सातारा जिह्यात वातावरणात वारंवार बदल होत असल्याने साथरोगांत वाढ झाली आहे. थंडी, ताप, अंगदुखी, सांधेदुखी, डोकेदुखी अशा व्याधींनी नागरिक त्रस्त झाले आहेत. बहुतांश रुग्णांमध्ये डेंग्यू व चिकुनगुणियासदृश लक्षणे आढळून आल्याने आरोग्य विभाग व हिवताप विभागाकडून गृहभेटीद्वारे सर्वेक्षण करण्यात आले. डेंग्यूअळ्या नष्ट करण्याबरोबरच संशयित नागरिकांचे मलेरिया चाचणीसाठी रक्ताचे नमुनेदेखील घेण्यात आले. अनेकांना जिल्हा रुग्णालयात डेंग्यू चाचणी करण्याचा सल्ला देण्यात आला. जिह्यातील डेंग्यू बाधितांची संख्या 318वर पोहोचली आहे. तसेच चिकुनगुणियाचे 38 रुग्ण झाले आहेत.
याचबरोबर स्वाईन फ्लूचे रुग्णदेखील आढळून येत असल्याने जिल्हावासीयांना धास्ती लागली आहे. डेंग्यू, चिकुनगुणियाचे रुग्ण वाढू लागल्याने आरोग्य विभाग अलर्ट झाला असून, सर्व आरोग्य केंद्रांना खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत. सर्वेक्षण करून रक्ताचे नमुने घेतले जात आहेत. बाधितांवर शासकीय रुग्णालयात उपचार केले जात आहेत. काही नागरिक खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.
दुखणे अंगावर काढू नका
– जिल्हा आरोग्य व हिवताप विभागाकडून खबरदारीच्या उपाययोजना राबविल्या जात असल्या, तरी नागरिकांनीदेखील काळजी घेणे गरजेचे आहे. घर व परिसराची नियमित स्वच्छता ठेवणे, घराजवळील पाण्याची डबकी बुजविणे, भंगार साहित्याची विल्हेवाट लावणे, भांडय़ांमध्ये जास्त काळ पाणी भरून ठेवू नये, आठवडय़ातून एक दिवस कोरडा पाळावा, कोणताही आजार अंगावर न काढता रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावेत, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.




























































