सात्त्विक, चिरागचा विक्रमी स्मॅश; थायलंड ओपन जिंकणारी पहिली हिंदुस्थानी जोडी ठरण्याचा बहुमान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । बँकॉक

हिंदुस्थानच्या सात्त्विक साईराज रानी रेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीने थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धा जिंकून नव्या विक्रमाला गवसणी घातली. सात्त्विक-चिराग जोडीने पुरुष दुहेरीत चीनच्या ली जून हुई-ल्यू यू चेन जोडीवर 21-19, 18-21, 21-18 अशी चुरशीची मात करीत थायलंड ओपन किताब पटकावला. ही स्पर्धा जिंकणारी पहिली हिंदुस्थानी जोडी बनण्याचा विक्रम या दोघांनी साकारला.

2018 साली सात्त्विकराज आणि चिराग शेट्टी जोडीने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये रौप्य पदक पटकावले होते. त्यानंतर एखाद्या मोठय़ा स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्याची हिंदुस्थानी जोडीची ही पहिलीच वेळ होती. अंतिम फेरीत हिंदुस्थानी बॅडमिंटनपटूंनी चीनच्या तिसऱया मानांकित ली जुन हुई आणि ल्यू यू चेन या चिनी जोडीचे आव्हान अतिशय शानदार खेळ करीत 3 गेममधे संपुष्टात आणले. जागतिक क्रमवारीत सोळाव्या स्थानावर असणाऱया हिंदुस्थानी जोडीने रविवारी अफलातून खेळ करीत ऐतिहासिक जेतेपदावर मोहोर उमटवली. 1 तास 2 मिनिटे चाललेल्या या अंतिम लढतीत हिंदुस्थानी जोडीने अनुभवी चिनी जोडीच्या तोडीस तोड खेळ करीत त्यांना जेरीस आणले.