हिंदूंनो, चार मुले जन्माला घाला; दोन आरएसएसला द्या! सत्यदेवानंद आणि साध्वी ऋतंभरा यांचे वादग्रस्त विधान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात धार्मिक हिंसाचार उसळला असतानाच सोमवारी अखिल भारतीय संत परिषदेचे हिमालयातील प्रभारी यती सत्यदेवानंद सरस्वती आणि साध्वी ऋतंभरा यांनी लागोपाठ वादग्रस्त विधाने केली. हिंदूंनो, जास्त मुलांना जन्माला घाला, असा सल्ला सत्यदेवानंद यांनी दिला. तर चार मुले जन्माला घाला, त्यातील दोन आरएसएस आणि विहिंपकडे सोपवा, असे विधान ऋतंभरा यांनी केले. या विधानांमुळे देशात धार्मिक वाद आणखी भडकण्याची शक्यता आहे.

काही दिवसांपूर्वी धर्मसंसदेत एका विशिष्ट समाजाला दुसऱया समाजाविरुद्ध हाती शस्त्र्ा घेण्याचे आवाहन कालीचरण महाराज यांनी केले होते. त्यानंतर सोमवारी सत्यदेवानंद सरस्वती यांनी हिंदुस्थान इस्लामिक राष्ट्र होण्यापासून रोखायचे असेल तर हिंदूंनी जास्त मुलांना जन्माला घातले पाहिजे, असे मत नोंदवले. दुसरीकडे कानपूरमध्ये विश्व हिंदू परिषदेच्या रामोत्सवात साध्वी ऋतंभरा यांनी हिंदूंनी चार मुले जन्माला घालावीत व त्यातील दोन मुले आरएसएस आणि विहिंपच्या माध्यमातून देशाला समर्पित करावीत, असा सल्ला दिला. देशातील राजकीय वातावरण खराब करून ज्या लोकांनी हिंदू समाजाला तुकडय़ांमध्ये विभागले आहे, त्यांना धूळ चारून हिंदुस्थानला हिंदू राष्ट्र बनवणार, असा निर्धार ऋतंभरा यांनी व्यक्त केला. हिंदू राष्ट्र बनवण्यासाठी जातीपातींमधून बाहेर या, देशाभिमान ठेवा, राजकीय पक्ष जातींचे गाजर दाखवून आपल्याला भुलवू शकत नाही. माझा देश आणि माझ्या देशाचे कल्याण सर्वतोपरी असायला हवे. हिंदू जातीचा हाच मंत्र असला पाहिजे, असे त्या म्हणाल्या.

हिंदू बांधवांनो, ‘हम दो, हमारे दो’ नाही, तर चार मुलांना जन्माला घाला. त्यातील दोन मुले देशासाठी समर्पित करा. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक बनतील, ते बजरंग दलाचे बजरंगदेव बनतील, ते विश्व हिंदू परिषदेचे समर्पित कार्यकर्ते बनतील.

  • साध्वी ऋतंभरा

हिंदुस्थान प्रजासत्ताक आहे, इथे हिंदू बहुसंख्य आहेत. मात्र मुस्लिम लोक पद्धतशीरपणे अधिक मुले जन्माला घालून आपली लोकसंख्या वाढवताहेत. म्हणूनच आम्ही हिंदूंना जास्त मुले जन्माला घालण्याचे आवाहन करतोय. जेणेकरून हिंदुस्थानला इस्लामिक राष्ट्र बनण्यापासून रोखता येईल.

  • यती सत्यदेवानंद सरस्वती