कतारला एकटे पाडण्यासाठी सौदीची कालव्याची रणनीती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । रियाद

आंतरराष्ट्रीय पातळीवर कतारला एकटे पाडण्यासाठी सौदी अरेबियाने नवीन रणनीती आखली आहे. कताराशी जमीनीचा संपर्क तोडण्यासाठी सौदी अरेबिया प्रचंड कालवा बनवणार आहे. या योजनेमुळे कतारला एकटे पाडण्यात येणार आहे. सौदीचा कतारशी संबंध तुटल्यानंतर कतारचे अस्तित्व फक्त एका बेटापुरतेच मर्यादीत राहणार असल्याचे आखाती देशांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. सौदी अरब, युएई आणि बहारीन या तीन देशांचे कतारशी तणावाचे संबंध आहेत. गेल्या 14 महिन्यांपासून त्यांच्यातील वाद वाढले असून या तिन्ही देशांनी कतारशी संबंध तोडले आहेत.

हा ऐतिहासिक प्रकल्प लागू होण्याची आम्ही आतूरतेने वाट बघत आहोत. हा प्रकल्प लागू झाल्यावर आखाती देशांचा भूगोलच बदलणार आहे. त्यामुळे सौदीचे कतारशी सर्व संबंध संपणार आहेत असे राजकुमार मोहम्मद बिन सलमान यांचे वरिष्ठ सल्लगार सऊद अल काहतानी यांनी सांगितले. या प्रकल्पामुळे सौदीच्या भूभागापासून कतार वेगळा पडणार आहे. सौदी, बहारीन आणि युएईने 2017 मध्ये कतारशी असलेले राजकीय आणि राजनैतिक संबंध तोडले होते. कतार दहशतवादाला प्रोत्साहन देत असून या देशांचा कट्टर शत्रू असलेल्या इराणशी जवळीक वाढवत असल्याचा आरोप या देशांनी केला होता. दरम्यान हे सर्व आरोप कतारने फेटाळून लावले होते.

कतारचा सौदीच्या भूभागापासून संबंध तोडण्यासाठी बनवण्यात येणारा कालवा ६० किलोमीटर लांब आणि २०० मीटर रुंद असणार आहे. या कालव्याचा उपयोग न्यूक्लिअर वेस्ट फॅसिलिटीसाठी वापरण्याचाही सौदीचा विचार आहे. कालवा बनवण्यात तज्ज्ञ असणाऱ्या पाच कंपन्यांकडून निविदा मागवण्यात आल्या आहेत. सप्टेंबरमध्ये कालव्याचे काम कोणत्या कंपनीला मिळणार ते स्पष्ट होणार आहे. सौदीच्या प्रशासकीय विभागाने याबाबत कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. तसेच कतारकडूनही याबाबत कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.