
>> सौरभ सद्योजात
शेकडो वर्षांच्या प्रयत्नानंतर अयोध्येत श्रीरामचंद्रांच्या विग्रहाची प्राणप्रतिष्ठा झाली. एक महत्त्वाचा आणि देखणा सोहळा पार पडला. पण या सोहळय़ाच्या निमित्ताने अनेक घटनांबाबत सांगोपांग विचार करण्याची गरज असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले. मंदिराची निकड काय म्हणणाऱयांपासून ते उन्मादी आवाजात जयघोष करणाऱया मंडळींपर्यंत सर्वांनी टोक गाठण्याची शिकस्त केली. धर्म, परंपरा, राजकारण आणि निवडणुका या सर्व घटकांचा गंध या सोहळय़ाला होताच हे उघड आहे. परंतु राम मंदिर हा त्याही पलीकडे जाऊन सांस्कृतिक स्थिरतेचाही मुद्दा आहे याकडे कुणी फारसे लक्ष दिल्याचे आढळून आले नाही. भारतीय इतिहास, समाज आणि संस्कृतीला वळण देऊ पाहणाऱया एका महत्त्वाच्या प्रश्नाचे उत्तर पदरात पडत असताना ते नीटसे झेलले गेले आहे की नाही, याबाबत अनेक मने साशंक आहेत. श्रीराम, श्रीकृष्ण आणि बुद्ध हे आपल्या सांस्कृतिक जीवनाचे अग्रगण्य व थोर नायक. परंतु स्वातंत्र्यानंतर अनेक वर्षे त्यांना केवळ धार्मिक चष्म्यातून पाहण्याचा नियोजित वेडेपणा अनेक तथाकथित बुद्धिवादी मंडळींनी केला आणि दुर्दैवाने त्यालाच उत्तर म्हणून शिंगं, कर्णे फुंकत दुसरी बाजू गोंगाटमय जल्लोषात तल्लीन झाल्याची दिसत आहे. एकूणच दोन्ही घटकांनी भारतीय धर्म, लोकजीवन आणि सांस्कृतिक साहित्य यांतून मिळणाऱया जीवन विचार, नीतिमूल्यांकडे पाठ फिरवली आहे व नव्या पिढीकडे हे संचित संयत पद्धतीने पोहोचवणारे हात आसपास दिसत नाहीत याचे वैषम्य माझ्यासारख्या विशीतल्या तरुणाला वाटत राहते.
वैदिक काळापासून ते मध्यकाळापर्यंत धर्माकडे पाहण्याचा दृष्टिकोन प्रगत झाल्याचा दिसतो. संतती, पशुधन आणि शांतता मागणाऱया संकुचित धार्मिक जाणिवेपासून ते भूतदया, ‘एकं सत विप्रा‘ आणि भक्ती परंपरेतील नामस्मरणाद्वारे ईश्वरप्राप्ती असा प्रागतिक प्रवास असल्याचे दिसून येते. धर्मातले वैचारिक मंथन, त्याद्वारे होणारी भौतिक आणि पारमार्थिक प्रगती हा विचारवृद्धीचा परिपाक आहे. त्यामुळे प्रभू रामचंद्रांचे स्मरण होताच सविनय शासन ऊर्फ रामराज्य सर्वांत आधी आठवते. ते तुलसीदासांपासून अगदी विसाव्या शतकात महात्मा गांधींनी त्यांच्या दृष्टिकोनातून मांडले. रामाच्या ध्यासाहून श्रेष्ठ त्याने स्थापन केलेल्या रामराज्याचा ध्यास असणे आहे. तुलसीदास वर्णनात म्हणतात,
दैहिक दैविक भौतिक तापा।
राम राज नहिं काहुहि ब्यापा।
सब नर करहिं परस्पर प्रीती।
चलहिं स्वधर्म निरत श्रुति नीती।
यातली ‘परस्पर प्रीती’ राष्ट्रीय भावना घडवत असते. तिची जपणूक करणे हे सर्वांचे आद्यकर्तव्य असले पाहिजे. भारतासारख्या बहुविध राष्ट्रात कुठलाही धर्म आणि तो पाळणारा समाज Xenophobic झाला तर ते ऐहिक प्रगती खुंटवणारी ठरेल. याहून भयकारी म्हणजे त्याने एकतेला होणारी इजा मोठी असेल याचे भान जाता कामा नये. औदार्याची सीमा काय वर्णू रघुरामा म्हणणाऱया तुकाराम महाराजांनी रामाचे हेच मोठेपण आपल्याला शिकवले आहे. त्याचा विसर पडू नये.
नको द्रव्यदारा नको येरझारा।
नको मानसी ज्ञानगवे फुगारा।
सगुणी मज लावि रे भक्तिपंथा।
रघुनायका मागणे हेचि आता।
समर्थ रामदास स्वामींनी रचलेल्या या करुणा स्तोत्रातले मागणे, त्यातली नम्रता आणि शरण येणारे शहाणपण आता आसपासच्या गोंगाटात जाणवत नाही. कुठेतरी खोल दाबून टाकले आहे आपण त्याला. अवडंबर, आक्रमकता आणि प्रतिक्रियावादी होऊ पाहणाऱया समाजाला, विशेषतः तरुण वर्गाला आपल्या संस्कृतीचा वैचारिक प्रवास आकळणे अतिशय गरजेचे आहे. ‘वादे वादे जायते’च्या मंथनातून घडलेला ‘भारत’ पण उन्मादी आवाजात कलकलाट करणाऱयांना उमगणार नाही, झेपणार तर त्याहून नाही. फक्त महाराष्ट्र ‘रामकृष्ण हरी’मधल्या अवीट गोडीपासून दुरावत आक्रमक धार्मिकतेकडे पोहोचण्याच्या प्रवासाला लागलाय का? अशी चिंता वाटते आणि ती खोटी ठरवण्यासाठी आपला विवेक जागृत ठेवणे हाच त्यावरील रामबाण ठरेल यात शंका नाही.





























































