वॉटर कप स्पर्धेच्या बक्षिसाच्या रक्कमेत अपहार, खेर्डा ग्रामपंचायत सरपंच अपात्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । धाराशिव

वॉटरकप स्पर्धे अंतर्गत कळंब तालुक्यातील खेर्डा ग्रामपंचायतीस बक्षीस म्हणून मिळालेल्या साडे सात लाख रक्कमेपैकी कांही रक्कम दलित वस्ती सुधार योजनेसाठी वापरल्याचे दाखवून सदर रक्कमेचा अपहार केल्याचे सिध्द झाल्याने खेर्डा गावच्या सरपंच सविता पोपट भंडारे यांना मराठवाडा अप्पर विभागीय आयुक्तांनी सरपंचपदासाठी अपात्र ठरविले आहे.

या प्रकरणाची थोडक्यात माहिती अशी की, खेर्डा ग्रामस्थ व पाणी फांऊडेशनच्या वतीने सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत गाव पाणीदार करण्यासाठी सहभाग नोंदविला होता. या कामात या गावास द्वितीय क्रमांक मिळाल्याबद्दल पाणी फाऊंडेशनच्या वतीने साडेसात लाखाचे बक्षीस देण्यात आले होते. सदर बक्षीसाची रक्कम २५ जानेवारी २०१८ रोजी ग्रामपंचायतच्या खात्यावर जमा झाली. सदर रक्कमेचा उपयोग पुढील जलसंधारण कामासाठी करणे आवश्यक असताना गावच्या सरपंच सविता पोपट भंडारे व ग्रामसेवकांनी मिळून या रक्कमेतील ८५ हजार ४० रुपये पाणी फाऊंडेशन समिती व ग्रामस्थांच्या परस्पर काढून सदर रक्कमेचा उपयोग कोणतेही काम न करता दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत काम केल्याचे दाखवून या रक्कमेचा अपहार केला.

या प्रकरणी खेर्डा येथील पाणी फाऊंडेशन समितीचे अध्यक्ष सुनिल साधूराम पाटील व सचिव भास्कर प्रल्हाद पाटील यांनी जिल्हा परिषदेकडे तक्रार दाखल केली. जिल्हा परिषदेने या तक्रारीची दखल घेवून प्रत्यक्ष पाहणी केली व या पाहणीत वॉटर कप स्पर्धेतील मिळालेल्या बक्षीसाच्या रक्कमेपैकी ८५ हजार ४० एवढी रक्कम ग्रामनिधी खात्यावरुन उचलून अपहार केल्याचा अहवाल अप्पर विभागीय आयुक्त संभाजीनगर यांच्याकडे पाठविला. या अहवालाची दखल घेत अप्पर विभागीय आयुक्तांनी खेर्डा ग्रामपंचायतीच्या सरपंच सविता पोपट भंडारे यांना सरपंच पदासाठी अपात्र ठरविले आहे.