
100 टक्के निकालाची परंपरा राखण्यासाठी मुंबईतील बऱयाच शाळांनी दहावीच्या विद्यार्थ्यांची शाळेत विशेष शिकवणी सुरू केली आहे. मुंबई महापालिकेने अजूनही शाळा, कॉलेज सुरू करण्यास परवानगी दिलेली नाही. मात्र विद्यार्थ्यांकडून परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी शाळांनी विद्यार्थ्यांना शाळेत बोलावण्यास सुरुवात केली आहे. परीक्षेच्या तोंडावर सकाळच्या सुमारास दोन ते तीन तास शाळा भरत असून उजळणीवर भर दिला जात आहे. तसेच प्रॅक्टिकल्स, प्रश्नपत्रिका सोडविण्याचा सराव, अवघड प्रश्नांची तयारी तसेच विद्यार्थ्यांचे काही प्रश्नही सोडविले जात आहेत.
मुंबई, ठाणे, नवी मुंबई महापालिका वगळता राज्यातील इतर जिह्यांमध्ये 23 नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेला दोन महिने शिल्लक राहिले असतानाही महापालिकेकडून शाळा सुरू करण्याविषयी कोणताच निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे काही शाळांनी विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी तसेच शाळेची 100 टक्के निकालाची परंपरा कायम राखण्यासाठी विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने शाळेत बोलावण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी शाळांनी 10-10 विद्यार्थ्यांचे गट करून त्यांना दिलेल्या वेळेत शाळेत येण्यास सांगितले आहे.
फक्त शाळा, कॉलेजसाठीच कोरोना?
मुंबई परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने शाळा, कॉलेज बंद आहेत. पण कोरोनाचा प्रादुर्भाव फक्त शाळा आणि कॉलेजसाठीच आहे का, असा सवाल शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी केला. परीक्षेच्या दृष्टीने महापालिकेने निदान दहावीचे नियमित वर्ग भरवण्यास परवानगी दिली पाहिजे, अशी मागणीही मोरे यांनी केली. तसेच सध्या शाळेत येणाऱया दहावीच्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या पालकाकडून पाल्याला शाळेत पाठविण्यासंबंधीचे हमीपत्रही शाळेकडून घेतले जात असल्याचे ते म्हणाले.
परीक्षेसंबंधी काम करण्यास परवानगी
केंब्रिज बोर्ड वगळता इतर सर्वच शिक्षण मंडळांना दहावी, बारावीच्या परीक्षेसंबंधी कामकाजास परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार शाळा विद्यार्थ्यांच्या पूर्व परीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षा घेऊ शकतात, पण प्रत्यक्षात नियमित वर्ग भरवण्यास अजून तरी परवानगी दिलेली नाही.-
– महेश पालकर, शिक्षणाधिकारी, मुंबई महानगरपालिका































































