
पृथ्वी, स्वर्ग, पाताळ असे त्रिलोक असल्याची मान्यता आहे. तसेच सप्तपाताळ असल्याचे अनेक दाखले पुराणात आहेत. मात्र, पृथ्वीवरच दोन पाताळ असल्याचा शोध संशोधकांनी लावला आहे. त्यातील एक पाताळ आफ्रिकेत आणि दुसरे दक्षिण पॅसिफिर महासागराखाली आहे. याबाबत संशोधकांनी अधिक माहिती दिली आहे.
पृथ्वीच्या आवरणाखाली एक पाताळ आहे, असे आधुनिक विज्ञानाच्या युगात भूकंपशास्त्रज्ञांनी शोधून काढले आहे. म्हणजे एका खंडाच्या आकारमानाची दोन ठिकाणे आहेत. त्यातील एक आफ्रिकेत आणि दुसरे दक्षिण पॅसिफिक महासागराखाली आहे. शास्त्रज्ञ या खंडाला ब्लॉब म्हणत आहेत. हे ब्लॉब त्यांच्या सभोवतालच्या कोणत्याही गोष्टीपेक्षा दाट आहेत. पृथ्वीची निर्मिती होत असतानाच हे खंड तयार झाले आहेत. काही अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीची मंगळाच्या आकाराच्या थिया या ग्रहाशी टक्कर झाली. या टक्करनंतर पृथ्वीचा चंद्र तयार झाला. त्यादरम्यानच्या काळातच यांची निर्मिती झाल्याचा अंदाज संशोधकांनी व्यक्त केला आहे.
पृथ्वीच्या आत दोन पाताळ कसे निर्माण झाले, याचा शोध संशोधक घेत आहेत. हे दोन ब्लॉब भूपृष्ठाखाली 2900 किलोमीटर खोलीवर आहेत. चायनीज अॅकॅडमी ऑफ सायन्सेसच्या शांघाय अॅस्ट्रॉनॉमिकल ऑब्झर्व्हेटरीचे संशोधक होंगपिंग डेंग यांनी सांगितले की, हे दोन्ही ब्लॉब पृथ्वीच्या निर्मितीच्या वेळी तयार झाले आहेत. थिया आणि पृथ्वीच्या टक्करमुळे हे ब्लॉक निर्माण झाले आहेत. पृथ्वी 450 कोटी वर्षांपासून सतत विकसित होत आहे. आपल्या पृथ्वीच्या आवरणातील बदलांचा हा परिणाम आहे.
या ब्लॉबने आपल्या पृथ्वीच्या गाभ्याला सर्व बाजूंनी वेढले आहे. ज्याला शास्त्रज्ञ लार्ज लो-शीअर-वेलोसिटी प्रोव्हिन्सेस (LLVPs) म्हणतात. भूकंप लहरींचा अभ्यास केला जात असताना हे आढळून आले. भूकंप लहरी पृथ्वीवरील वेगवेगळ्या वस्तूंवर वेगवेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया देतात. या लहरींमुळेच हे दोन्ही एलएलव्हीपी आढळून आले. हे प्राचीन टेक्टोनिक स्लॅब असू शकतात, जे प्रचंड ऊर्जेने भरलेले आहेत. ते आवरणाच्या पायथ्याजवळ लावाच्या महासागराच्या वर तरंगत आहेत. पृथ्वीशी टक्कर झालेल्या थियाचा एक मोठा भाग चंद्र बनला. मात्पर, त्याचवेळी त्या ग्रहाचा काही भाग पृथ्वीच्या आतही राहिला. जे आता ब्लॉबसारखे दिसते. त्याचाच उल्लेख पाताळ असा होतो.
पृथ्वीच्या वजनापैकी फक्त 2-3 टक्के वजन हे थिया या पदार्थांनी बनलेले आहे, असा एक अभ्यास आहे. परंतु दोन्ही पाताळाची घनता त्यांच्या सभोवतालच्या पदार्थांपेक्षा 2 ते 3.5 पट जास्त आहे. त्यात लोहाचे प्रमाणही खूप जास्त असते. या संशोधनामुळे पृथ्वीच्या निर्मितीची आणखी काही रहस्ये उलगडण्याची शक्यता आहे. या संशोधनाबाबतचा लेख नुकताच नेचर जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे.


























































