दुचाकी चालवताना हेल्मेट घालणे सक्तीचे आहे. असे असतानाही अनेकजण नियमांचे सर्रास उल्लंघन करताना दिसतात. अपघात झाल्यावर हेल्मेट न घातल्यामुळे डोक्याला मार लागून मृत्युमुखी पडणाऱयांची संख्या देखील मोठी आहे. विविध सामाजिक संस्था, वाहतूक पोलीस देखील हेल्मेटबाबत जनजागृती करताना दिसतात. जरा विचार करा जेवर तुम्ही हेल्मेट घालत नाही तोवर तुमची दुचाकी स्टार्टच झाली नाही तर… अहो ही गंमत नाही.
सध्या बाजारात अनोखी स्कुटर आली आहे. या स्कूटरचे वैशिष्टय़ म्हणजे हेल्मेट घातल्याशिवाय ही स्कूटर स्टार्टच होत नाही. बीएमडब्ल्यू सी 400 जीटी असे या स्कूटरचे नाव आहे. इतर स्कूटरमध्ये सीटखालील जागा लोक शक्यतो स्टोरेजसाठी वापरतात. मात्र, या स्कूटरमध्ये सीटखालील जागा केवळ हेल्मेट ठेवण्याच्या उद्देशानेच खास बनवली आहे. त्याला कंपनीने फ्लेक्सकेस असे नाव दिले आहे. तुम्ही गाडी पार्क करून त्यात हेल्मेट ठेवल्यानंतर फ्लेक्सकेस उघडते. जोपर्यंत ही फ्लेक्स केस उघडी असते तोपर्यंत या स्कूटरचे इंजिन अजिबात सुरू होत नाही.


























































