सील इमारतीतील दूध, किराणा, वृत्तपत्राची घरपोच सेवा बंद; नियम मोडल्यास सोसायटीच जबाबदार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वाढत्या कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी महापालिकेने आज अधिक कठोर नियम जारी केले. सील इमारतींमधील दूध, किराणा, वर्तमानपत्रांची घरपोच सेवा बंद करण्यात येणार आहे. रुग्ण सापडलेला फ्लॅट सील करण्याची जबाबदारी सोसायटीची राहणार असून हा नियम मोडल्यास सोसायटीला 10 हजारांचा दंड केला जाणार आहे. नियमांच्या पालनावर लक्ष ठेवण्यासाठी इमारतीबाहेर एक पोलीस कर्मचारी 24 तास तैनात करण्यात येणार आहे.

मुंबईत वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जारी केलेल्या कोरोना नियमांची पालिकेकडून कठोरपणे अंमलबजावणी सुरू असून आज मुंबई महापालिकेने कोरोना नियम अधिक कठोर करत त्याबाबतचे परिपत्रक मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी वॉर्ड अधिकाऱयांना जारी केले.

लक्षणे नसलेल्या पॉझिटिव्ह रुग्णाचे घर सील करण्याची जबाबदारी सोसायटीच्या पदाधिकाऱयांची असणार आहे. कोरोनाचे हे नियम मोडल्यास सोसायटीला 10 हजारांचा दंड तर दुसऱयांदा हा नियम मोडल्यास 20 हजारांचा दंड वसूल केला जाणार आहे. स्वॅब गोळा करण्यासाठी योग्य ती काळजी घेऊन लॅब कर्मचारी घरी येण्यास परवानगी देण्यात आली आहे. रहिवाशांच्या येण्या-जाण्यावर कोणतीही बंधने नसली तरी इमारतीबाहेर जा-ये करणाऱया रहिवाशांचे ऑक्सिजन आणि तापमान नियमितपणे तपासणे बंधनकारक करण्यात आले आहे. दरम्यान, सोमवारपासून कठोर निर्बंध लादले गेल्यानंतरही काही ठिकाणी अत्यावश्यक सेवेत न मोडणारी दुकाने, हॉटेल्स सुरू असल्यामुळे पोलिसांनी ही दुकाने, हॉटेल्स कारवाई करून बंद केली.

बागा, चौपाटय़ांवर रात्रीची बंदी

मुंबईत दिवसा जमावबंदी तर रात्री संचारबंदी लागू केल्याने बागा, चौपाटय़ा, समुद्रकिनारे इत्यादी सार्वजनिक ठिकाणे रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत पूर्णतः बंद राहतील. दिवसा या ठिकाणी लोक आरोग्याचे नियम न पाळता गर्दी करीत आहेत असे आढळले तर त्या विभागातील पालिका सहाय्यक आयुक्त ही ठिकाणे पूर्णपणे बंद करू शकतात.

नवीन नियमांनुसार पाचपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळणाऱया रहिवासी सोसायटय़ांना सील करून त्यांना मायक्रो पंटेनमेंट झोन घोषित केले जाणार आहे. इमारत सील केल्याचा बोर्ड इमारतीच्या प्रवेशद्वारावर लावणे बंधनकारक असून इमारतीबाहेरील व्यक्तीला प्रवेशबंदी असेल. वैद्यकीय आणीबाणी आणि बोर्डाची परीक्षा देणाऱया विद्यार्थ्यांना इमारतीबाहेर जाण्याची परवानगी असेल.

दोन दिवसांपुरतेच लसीचे डोस शिल्लक

कोरोना वाढत असताना लसीकरण वेगाने होण्यासाठी पालिका प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे. दररोज सुमारे 45 ते 50 हजार कोरोना लसीकरण होत आहे. मात्र पालिकेकडे सद्यस्थितीत केवळ दोन ते तीन दिवस पुरेल इतकेच डोस शिल्लक आहेत. यामध्ये कोव्हीशिल्डचे दीड लाख तर कोव्हॅक्सिनचे केवळ 8840 डोस शिल्लक आहेत. त्यामुळे मुंबईसाठी केंद्राने आवश्यक लसींचा पुरवठा करावा अशी मागणी महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली आहे.